अयोध्येतील श्रीरामलल्लाच्या नव्या मूर्तीत बुद्धाला विष्णूचा नववा अवतार दाखवले, तथागताचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न!


मुंबईः  उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मोदींनी अनुष्ठान केल्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी हटवण्यात आली. परंतु अयोध्येतील राम मंदिरात बसवण्यात आलेल्या श्रीरामाच्या मूर्तीच्या शिल्पात विष्णूचे दहा अवतार कोरण्यात आले असून भगवान बुद्धाला त्या दहा अवतारांपैकी विष्णूचा नववा अवतार दाखवण्यात आले आहे. हे बुद्धाचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका होत असून त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

 म्हैसूरचे शिल्पकार अरूण योगीराज यांनी काळ्या दगडात रामलल्लाची ही मूर्ती घडवली आहे. मूर्तीची उंची ४.२४ फूट म्हणजेच ५१ इंच आणि रुंदी ३ फूट आहे. रामलल्लाच्या या मूर्तीचे वजन २०० किलो आहे. प्रभू श्रीरामाच्या या मूर्तीत पाच वर्षीय बालकाची कोमलता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दक्षिणी शिल्प शैलीत घडवण्यात आलेली ही मूर्ती उभ्या अवस्थेत आहे. काळ्या पाषाणाचे आयुर्मान हजारो वर्षे असते, असे सांगण्यात येते.

मूर्तीची ही वैशिष्ट्ये असली तरी या मूर्तीत कोरण्यात आलेली विष्णूच्या दहा अवताराची शिल्पे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.  या म्रूर्तीत विष्णूचे दहा अवतार दाखवण्यात आले आहेत. त्यात मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की या दहा अवतारांचा समावेश आहे. त्यावरून आता समाज माध्यमांवर उलट सुटल प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

 ‘भगवान बुद्ध हे विष्णूचा अवतार होते, असे मी मानत नाही आणि कधीही मानणार नाही. मी हे पागलपन णि खोटा प्रचार-प्रसार मानतो,’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केव्हाच स्पष्ट केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर धर्मांतर केल्यानंतर ज्या २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या, त्यात पाचवी प्रतिज्ञा ‘मी बुद्धाला विष्णूचा अवतार मानणार नाही,’ ही आहे.

असे असले तरी बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार होता, हा ‘प्रोजेक्ट हिंदुत्वा’चे महत्वपूर्ण लक्ष्य राहिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि त्याच्याशी संबंधित संघटना बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार होता आणि बौद्ध धर्म ही हिंदू धर्माचीच एक शाखा आहे, असा पद्धतशीर प्रचार-प्रसार करत आले आहेत.

इसवी सन पूर्व तिसऱ्या-चौथ्या शतकात बुद्धाचा विचार प्रबळ होत होता आणि वैदिक धर्म मानणारे त्यामुळे हैराण होते. त्याचे प्रमाण दस्तूरखुद्द रामायणातच सापडते. गोष्ट मोठी रंजक आहे. जेव्हा भरताने अनेक विनंत्या- याचना करूनही राम अयोध्येला परत यायला तयार होत नव्हते, तेव्हा दशरथाचे ‘याजक’ म्हणजेच यज्ञकर्ते आणि ‘ब्राह्मण शिरोमणी’ जाबालीने त्यांना जे म्हटले होते, त्याचा अर्थ ’नाते-गोते काही नसतात. प्रत्येक व्यक्ती जगात एकटाच येतो. कोणतेही परलोक-वरलोक असत नाही. जा आणि अयोध्येत राज्य राज्य करा,’ असा होता.

जाबाली या‘ नास्तिकता’ आणि ‘बुद्धाच्या प्रभावाखाली’  आलेला पाहून राम त्याला खूप सुनावतात. एक श्लोक तर अत्यंत कडवट आहे. तो असा-

यथा हि चोरःस तथा हि बुद्धःस्तथागतं नास्तिकमत्र विद्धि|
तस्माद्धि यः शक्यतमः प्रजानां स नास्तिके नाभिमुखो बुधःस्यात
||

अर्थात चोर दंडनीय असतो, त्याच प्रमाणे (वेदविरोधी) बुद्ध (बौद्धतावलम्बी) ही दंडनीय आहे. तथागत (नास्तिक विशेष) आणि नास्तिकाला (चार्वाक) ही याच पठडीतले समजले पाहिजे. त्यामुळे प्रजेवर अनुग्रह केल्यामुळे राजाद्वारे नास्तिकाला जो दंड दिला जात असेल तर, तो चोराप्रमाणेच दिला गेला पाहिजे, परंतु तो वश करण्याच्या बाहेर असेल तर, त्या नास्तिकाला विद्वान ब्राह्मणाने कधीही तोंडावर तोंड देऊ नये, त्याच्याशी वार्तालापही करू नये. (अयोध्याकांड, श्लोक ३४, १०९ वा सर्ग, पृष्ठ क्रमांक ५२८, वाल्मिकी रामायण, प्रकाशकः गीता प्रेस गोरखपूर)

या श्लोकामधून रामायणाचे रचनाकार हे बौद्धमताच्या वाढत्या प्रभावामुळे दुखी होते आणि त्यामुळे त्यांना चोरांप्रमाणे दंड आकारण्याची मागणी करतात. त्यामुळे बुद्ध काळ हा रामायणाची रचना करण्याच्या आधीचा काळ होता आणि बुद्ध धम्माच्या प्रभावामुळे तत्कालीन सनातनी हैरान होते, असे असताना बुद्ध हा विष्णूचा अवतार असण्याचा प्रश्न येतोच कुठे? असाही सवाल केला जाऊ लागला आहे.

तर्क आणि बुद्धीप्रामाण्यवादाला प्रामुख्याने महत्व देणाऱ्या समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडात ढकलण्यासाठीच बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार असल्याचे भासवले जात आहे. त्याचीच प्रचिती अयोध्येत आज प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या रामलल्लाच्या मूर्तीतही आली आहे. त्यावरून आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

प्रिय बौद्ध धर्मीय, रामाच्या मूर्तीवर बुद्धाला विष्णूचा अवतार दाखवण्यात आले हे तुम्हाला माहीत आहे का? मी जर तुमच्यापैकी एक असतो तर माझ्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे मी क्रिमिनल केस दाखल केली असती… सहज म्हणतो, असे एका ट्विटर यूजरने म्हटले आहे.  हे बुद्ध तत्वज्ञानाच्या विरोधात नाही का? बुद्ध हे विष्णूचा अवतार नाहीत. हा बुद्ध धर्माचे धर्म म्हणून स्वतंत्र अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न आहे, असेही या यूजरने म्हटले आहे.

 या पाखंडींनी तथागत बुद्धाला मुख्य राममूर्तीमध्ये अवताराच्या रुपात दर्शवले आहे. हे अत्यंत चुकीचे असून बौद्ध धर्म मानणाऱ्या सर्वांना विनंती करतो की, आपण याचा विरोध करा. हे एक मोठे षडयंत्र आहे, असे विक्रम सिंग या ट्विटर यूजरने म्हटले आहे.

बुद्धाला हिंदू देवाचा अवतार म्हणून चित्रित करणे हा बुद्धाचा अपमान आहे. राम मंदिर ट्रस्टींनी राममूर्तीवरील बुद्ध तत्काळ काढून टाकावा, अशी मागणी एक ट्विटर हँडलवरून करण्यात आली आहे.

रामायणात बुद्धाचा १६ वेळा उल्लेख आलेला आहे. त्यानुसार बुद्धाचा जन्म रामाच्या खूपच आधी झालेला होता, त्यामुळेच रामायणात त्यांचा उल्लेख आला आहे. मग राम हे विष्णूचे आठवे आणि बुद्ध नववे अवतार कसे झाले?  अवतारांमध्ये बुद्धाचे स्थान तर रामाच्या कितीतरी आधी यायला हवे होते. एवढी घालमेल का? हे स्पष्ट करा, असे अमित सिंग यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!