छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): येथील गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात २८ जानेवारीपासून राष्ट्रीय शालेय सॉफ्ट बॉल व राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी याकाळात शालेय सॉफ्ट बॉल स्पर्धा होतील तर ६ ते १० फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा होतील, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी दिली.
या स्पर्धांच्या आयोजनासाठी अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गोकुळ तांदळे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, महापालिकेचे क्रीडा अधिकारी संजीव बालय्या आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल (१९ वर्षे मुले व मुली) क्रीडा स्पर्धा २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. या स्पर्धेत देशभरातील २५ राज्यातून किमान ९०० ते १००० खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक, अधिकारी व पंच सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन सोमवार, २९ जानेवारी रोजी सायंकाळी पालकमंत्री संदिपान भुमरे व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या स्पर्धांच्या पारितोषिक वितरणास क्रीडा मंत्री संजय बनसोडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार तसेच मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, असे देसाई यांनी सांगितले.
राष्ट्रीय शालेय तलवारबाजी (१७ वर्षे मुले व मुली) क्रीडा स्पर्धा ६ ते१० फेब्रुवारी या कालावधीत विभागीय क्रीडा संकुलातच होणार आहेत. या स्पर्धेत देशातील ७०० खेळाडू, प्रशिक्षक ,मार्गदर्शक, अधिकारी व पंच सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
खेळाडूंचा सत्कार
या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग घेवून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा व गतवर्षिच्या शिवछत्रपती पुरस्कारार्थींचा सत्कार करण्यात येणार असून त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू: तेजस पाण्डेय, ईश्वरी शिंदे, अक्षय बिरादार ( सर्व सॉफ्टबॉल), सृष्टी काळे (बॉक्सिंग), श्रध्दा चोपडे (ज्युदो), अदिती निलंगेकर (जलतरण), अभय शिंदे, निखील वाघ, वैदेही लोहिया , रोहन शहा, तेजस पाटील, श्रेयस जाधव, तुषार आहेर, दुर्गेश जहागिरदार ( सर्व तलवारबाजी) यांचा समावेश आहे.
शिवछत्रपती पुरस्कारार्थीमध्ये विनय साबळे, वैदेही लोहिया, अभय शिंदे (सर्व तलवारबाजी), आदित्य जोशी, ऋग्वेद जोशी, सिद्धार्थ कदम (सर्वजिम्नॅस्टिक्स) यांचा समावेश आहे. या स्पर्धांच्या आयोजनाचा क्रीडाप्रेमी, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.