मुंबईः प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवतन देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चेलाही उपस्थित राहण्याचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला देण्यात आले आहे. आता ‘वंचित’ या बैठकीला उपस्थित रहाते की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेशी यापूर्वीच युती केली आहे. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडकाठीमुळे वंचितचा समावेश महाविकास आघाडीत करण्यात आला नव्हता. परंतु आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीचे अधिकृत निमंत्रण वंचितला देण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या स्वाक्षरीनिशी हे निमंत्रण देण्यात आले आहे. मुंबईच्या नरीमन पॉइंट येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये आज (२५ जानेवारी) दुपारी तीन वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नावे आवतनाचे हे पत्र धाडण्यात आले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर हे पत्र शेअर केले आहे.
काय आहे पत्रात?
मा. श्री. प्रकाश आंबेडकरजी,
अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
नमस्कार!
देश अत्यंत कठीण कालखंडातून जात आहे. आपण स्वतः महाराष्ट्रासह देशभरात सध्याच्या हुकुमशाहीविरोधात खंबीरपणे आवाज उठवत आहात. देश व संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येऊन हुकुमशाहीविरुद्ध लढा देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा करत आहेत. वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्वाचा घटक असून दिनांक २५ जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत वंचित आघाडीने सहभागी व्हावे, अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. कृपया वंचिततर्फे महत्वाचे नेते, आपण आजच्या बैठकीसाठी पाठवावे, ही विनंती.
असे महाविकास आघाडीने या पत्रात म्हटले आहे. आता वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीच्या या निमंत्रणाचा स्वीकार करून आजच्या बैठकीला उपस्थित रहाते की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.