मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मराठा समाज बांधवांचा जत्था घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. असे असले तरी मनोज जरांगे हे आझाद मैदानावर येऊन आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
मुंबईतील आझाद मैदान हे आंदोलनासाठीच राखीव आहे. परंतु मनोज जरांगे हे लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधवाना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचे कारण देत मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मुंबई पोलिसांनी जरांगे यांना उपोषणासाठी पर्यायी जागाही सुचवली आहे. नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्कच्या मैदानावर उपोषण करावे, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
ज्याअर्थी आपण लाखोंच्या संख्येने आंदोलक आणि वाहनांसह मुंबईत येणार असल्याचे घोषित केले आहे, त्यामुळे मुंबईतील दैनंदिन जीवन विस्कळित होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
मुंबईची लोकसंख्या, वाहनांची संख्या, अरूंद रस्ते, उपलब्ध नसलेले पर्यायी रस्ते, खोळंबणारी वैद्यकीय सेवा-सुविधा, त्यामुळे रूग्णांची होणारी हेळसांड, इतर अत्यावश्यक सेवांवर पडणारा प्रभाव पाहता मुंबईतील एकूण सार्वजनिक व्यवस्थेवर विपरित परिणाम होणार असल्याचेही मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
आझाद मैदानाचे ७ हजार चौरस फूट एवढेच क्षेत्र आंदोलनांसाठी राखीव आहे. त्याची क्षमता ५ हजार ते ६ हजार आंदोलक सामावून घेण्याची आहे. तेथे प्रचंड संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी आझाद मैदानावर पुरेशी जागा उपलब्ध होणार नाही. त्याप्रमाणात तेथे सोयीसुविधाही नाहीत. उर्वरित मैदान क्रीडा विभागाच्या ताब्यात असून तेथे आंदोलनाला परवानगी नाही, असेही मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
जरांगे मात्र ठाम
मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मनोज जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदानावर येऊन आंदोलन करण्यावर ठाम आहेत. मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांना आझाद मैदानातील एका बाजूला आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे त्यांनी मला कळवले आहे.तेथे स्टेज उभारणीचे कामही सुरू आहे. त्यामुळे मी इथून आझाद मैदानावर जाणार आहे. आमचे आणि मुंबईचे हाल होऊ नयेत हे सरकारच्या हातात आहे. आम्हाला आरक्षण द्या, आम्ही घरी जातो, असे मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळा येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.