
नांदेडः नांदेड शहरातील गुन्हेगारीचे विश्व दिवसेंदिवस भीषण रुप घेत चालले असून शुक्रवारी मध्यरात्री गुन्हेगारी वर्चस्वाच्या वादातून साई लाला आणि अनिल पंजाबी गँगमध्ये आधी ई स्क्वेअर परिसरात तलवारीने हाणामारी झाली. त्यात दोघांचा खून झाला. त्यानंतर मृत गुन्हेगाराच्या भावाने थेट शासकीय रुग्णालयात जाऊन ‘खून का बदला खून’ स्टाईलने डोक्यात खंजर घालून खून केला. या तिहेरी खूनामुळे नांदेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अनिल पंजाबी गँगचा आणि सदा गँगचा सदस्य असलेला आराजितसिंह चव्हाण हा शुक्रवारी रात्री आपल्या मित्रांसोबत नांदेड शहरातील कॅनाल रस्त्यावर असलेल्या ई-स्क्वेअर सिनेमा टॉकीजमध्ये धुरंधर-२ हा सिनेमा पहायला गेला होता. आराजितसिंह हा चित्रपट पाहून परत येत असताना साई लाला गँगचे सदस्य महंमद आरबाज आणि सय्यद आवेद यांनी पाळत ठेवून त्याला गाठले. त्यानंतर दोन्ही गँगमध्ये तलवार आणि खंजरने तुंबळ हाणामारी झाली. या धुमश्चक्रीत आराजितसिंह चव्हाण आणि महंमद आरबाज या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या धुमश्चक्रीत सय्यद आवेज सय्यद खलील, घनश्याम रेड्डी हेही गंभीर जखमी झाले. भररस्त्यात झालेल्या या खुनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी या धुमश्चक्रीत जखमी झालेल्यांना तातडीने कै. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आराजितसिंहचा छोटा भाऊ राजेश चव्हाण हा शुक्रवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास खंजर घेऊन थेट शासकीय रुग्णालयात पोहोचला. तेथे अपघात विभागात उपचार घेत असलेल्या सय्यद आवेज याच्या डोक्यावर खंजरने सपासप वार करत त्याला तेथेच ठार केले. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली.
एकाच वेळी नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला करण्यात आल्यामुळे हल्लेखोरांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. गुन्हेगारी वर्चस्वाच्या वादातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या हल्ल्यातील इतर साथीदारांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे इत्यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा केले आहेत. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी तातडीने निष्पन्न करून त्यांना अटक करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन्ही गँगमधील चार संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मयत आराजितसिंह चव्हाण याच्यावर नांदेड जिल्ह्यात ९ तर महंमद आरबाज याच्यावर पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
