आता पेट्रोल-डिझेलचेही रेशनिंगः दुचाकीसाठी २०० रुपयांचे तर तीन व चार चाकी वाहनांसाठी मिळणार दोन हजारांचेच इंधन, ‘या’ चार जिल्ह्यांत अंमलबजावणी सुरू


मुंबईः ईराण-इस्त्राईल-अमेरिका युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याच्या अफवा पसरू लागल्यामुळे महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पेट्रोलपंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या असून त्यामुळे पेट्रोलपंपांवर अतिरिक्त ताण येत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आता महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे रेशनिंग सुरू करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचे रेशनिंग करून खरेदीवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत.

 पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवा पसरू लागल्यामुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नसतानाही अफवांमुळे राज्यातील अनेक शहरांतील पेट्रोलपंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे पहायला मिळू लागले आहे. त्यामुळे एका दिवसाच्या आवकेच्या तुलनेत तिप्पट मागणी जात असल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अनावश्यक पेट्रोल-डिझेलची खरेदी करू नये म्हणून छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाने इंधनाच्या रेशनिंगचा निर्णय घेतला आहे.

आपल्याकडे पेट्रोल डिझेलची पुरेशी आवक आहे, मात्र अतिरिक्त मागणी केली जात असल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी रेशनिंगचा निर्णय घेण्यात आला असून यापुढे गिअर नसलेल्या दुचारी वाहनांना २०० रुपये, गिअर असलेल्या बाईकला ३०० रुपये तर चारचाकी वाहनांना जास्तीत जास्त १५५ रुपयांचे पेट्रोल खरेदी करता येईल, असे नांदेडचे जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. कॅन किंवा सुट्या स्वरुपात पेट्रोल-डिझेलची विक्री करू नये, अशी सक्त ताकीद पेट्रोलपंप चालकांना देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातही इंधनाचे रेशनिंग लागू करण्यात आले असून दुचाकी वाहनांसाठी २०० रुपयांचे तर तीन व चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचेच पेट्रोल-डिझेल खरेदी करता येईल. इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवांमुळे इंधनाची मागणी आणि पुरवठ्यात तात्पुरता असमतोल निर्माण झाला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी इंधनाच्या रेशनिंगचे आदेश जारी केले आहेत. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच इंधनाचे रेशनिंग लागू केले आहे. आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या वाहनांना मात्र हा आदेश लागू असणार नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातही असेच रेशनिंग लागू करण्यात आले असून २५ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. इंधनसाठा योग्य पद्धतीने वापरला जावा आणि अत्यावश्यक सेवांना पुरेसा पुरवठा व्हावा, यासाठी इंधनाच्या रेशनिंगचे हे पाऊल उचलण्यात आल्याचे कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!