
मुंबईः राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी जारी केलेल्या एका आदेशानुसार धर्माबाद, मुखेड, बारामती, फलटण, महाबळेश्वर आणि पाथर्डीसह राज्यातील १९ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवकाच्या निवडणुकीचे मतदान १८ दिवस लांबणीवर पडले आहे. सुधारित कार्यक्रमानुसार या नगरपालिकांसाठी आता २० डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार असून २१ डिसेंबर रोजी मतमोजणी करून निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने या आधी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच आणि प्रचाराला केवल एकच दिवस (१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत) शिल्लक राहिलेला असताना राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील तब्बल १९ नगर पालिकांची निवडणूक लांबणीवर टाकली आहे.
राज्यातील ज्या नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये नामनिर्देशनपत्रांच्या छाणनीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद (अपील) मागण्यात आली होती. त्या प्रकरणात २२ नोव्हेंबरपर्यंत निकाल लागणे अपेक्षित होते. तसे झाले असते तर उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तीन दिवसाचा अवधी मिळाला असता. पण काही ठिकाणी उमेदवारांना अशी संधी मिळाली नाही. अशा ठिकाणी २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले होते. ही बाब नियमबाह्य ठरवत राज्य निवडणूक आयोगाने अशा नगरपरिषदा, नगरपालिका व नगर पंचायतींसाठी शनिवारी सुधारित कार्यक्रम जाहीर केला.
या सुधारित कार्यक्रमानुसार उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १० डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ११ डिसेंबर रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल. २० डिसेंबर रोजी मतदान घेतले जाईल आणि २१ डिसेंबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केले जातील. फक्त महाबळेश्वर नगरपालिकेसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होईल आणि २२ डिसेंबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.
मतदान पुढे गेलेल्या नगरपालिका अशा
अंबरनाथ, बारामती, फलटण, महाबळेश्वर, पंढरपूर, दिग्रस-पांढरकवडा, वणी, कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, बाळापूर, धर्माबाद, मुखेड, तळेगाव, अंजनगाव सुर्जी, पूर्णा, जिंतूर, घुग्घुस.
उमेदवारांच्या पोटात गोळा
राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर करून १९ नगर पालिकांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. कारण या उमेदवारांना आता पुन्हा नव्याने प्रचार, नव्याने खर्च आणि नव्याने सभांचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे आधीच खर्च करून शिणलेल्या उमेदवारांच्या पोटात गोळा आला आहे.
