राज्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींची मतमोजणी आणि निकाल २१ डिसेंबरलाच; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश


नागपूरः  राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान होत असले तरी राज्य निवडणूक आयोगाने आधी जाहीर केल्याप्रमाणे आज मतदान झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी उद्या ३ डिसेंबर रोजी होणार नाही आणि निकालही लागणार नाहीत. आज (२ डिसेंबर) आणि २० डिसेंबर रोजी होणाऱ्या दोन्ही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतरच सर्व नगर परिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करून निकाल जाहीर केला जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबतचे आदेश दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल असे जाहीर केले होते. परंतु न्यायालयीन खटल्यांचा पेच निर्माण झाल्यामुळे २४ नगरपरिषदा आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी आज मंगळवारी (२ डिसेंबर) रोजी होणारी निवडणूक २० डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडली आहे. या २४ नगरपरिषदा आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होऊन २१ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले होते.

याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन दोन्ही टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतरच २१ डिसेंबर रोजी एकत्रित मतमोजणी करून निकाल जाहीर करण्याचा आदेश नागपूर खंडपीठाने दिला आहे. २० डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर अर्ध्यातासाने दोन्ही टप्प्यांतील एक्झिट पोल जाहीर करण्याची मुभा देण्यात आली आहे. आज मतदान होत असलेल्या आणि २० डिसेंबर रोजी मतदान होऊ घातलेल्या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच घेण्याच्या हालचाली राज्य निवडणूक आयोगाने सुरू केल्या आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या या आदेशानंतर आज मतदान झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी उद्या बुधवारी होणार नाही. त्यामुळे आज मतदान होऊ घातलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना डोळ्यात तेल घालून २१ डिसेंबरपर्यंत ईव्हीएमवर पहारा द्यावा लागणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!