
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मराठी लिहिता-वाचताही न येणाऱ्या शेख मोहम्मद हाफीज याला बनावट व खोट्या पदव्यांच्या आधारे पूर्णवेळ सहशिक्षकपदावर नियुक्ती दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मान्यता रद्द केलेला कोहिनूर महाविद्यालयाचा प्राचार्य प्रा. डॉ. शंकर अंभोरेला २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आता पोलिस कोठडीत प्रा. डॉ. अंभोरेंची कसून चौकशी केली जाणार आहे.
शेख मोहम्मद हाफीज उर रहेमान याने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून बी.ए., एम. ए. ची बनावट व खोटी पदवी तयार केली. या बनावट व खोट्या पदव्यांच्या आधारे त्याने खुलताबाद येथील कोहिनूर कनिष्ठ महाविद्यालयात अंशत: अनुदानित पूर्णवेळ सहशिक्षकपदाची नोकरी मिळवली होती.
शेख मोहम्मद हाफीज उर रहेमानची बोगसगिरी उघडकीस आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनी पोलिस आयुक्ताकडे अहवाल दिल्यानंतर शोख मोहम्मद हाफीजला काल (१८ एप्रिल) सकाळी पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मझहर खान आणि प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे या दोघांनीच या सगळ्या प्रकरणात मदत केल्याचे शेख मोहम्मद हाफीज उर रहेमानने सांगितल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी प्रा. डॉ. शंकर अंभोरेंना पेठेनगरातील राहत्या घरातून उचलले आणि रात्री अटक केली.
शनिवारी पोलिसांनी प्रा. डॉ. शंकर अंभोरेंना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पाच दिवसांच्या कोठडीत प्रा. डॉ. अंभोरेंची पोलिसांकडून कसून चौकशी जाणार आहे. या चौकशीत प्रा. डॉ. अंभोरेंकडून बनावट पदवी घोटाळ्याबाबत महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
