
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): बनावट आणि खोट्या एम.फिल. पदवीच्या आधारे पीएच.डी. ला प्रवेश मिळवल्याप्रकरणी आणि अशाच पदव्यांवर एकाला कोहिनूर महाविद्यालयात पूर्णवेळ सहशिक्षकाची नोकरी दिल्याप्रकरणी चार जणांना बेड्या ठोकल्यानंतर पोलिसांनी आता आपला मोर्चा खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयातील प्रा ध्यापकांकडे वळवला आहे. या महाविद्यालयातील १२ प्राध्यापकांच्या एम.फिल. आणि पीएच.डी.च्या पदव्या संशयास्पद असून त्या पदव्यांची संबंधित विद्यापीठांकडून तत्काळ पडताळणी करून अहवाल सादर करा, असे फर्मान पोलिसांनी विभागीय सहसंचालकांना (उच्च शिक्षण) बजावले आहे. विशेष म्हणजे अनेकांकडे अस्तित्वातच नसलेल्या विद्यापीठांच्या पदव्या असल्याचा संशय आहे.
पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून इंग्रजी आणि हिंदी विषयातील एम.फिल. ची बनावट व खोटी पदवी तयार करून २०२१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेट परीक्षेतून सूट मिळवून पीएच.डी. ला प्रवेश मिळवल्याप्रकरणी कोहिनूर शिक्षण संस्थेची सचिव आस्मा खान आणि सहसचिव पठाण मकसूद खान यांच्यावर बेगमपुरा पोलिसांत २६ मार्च रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आस्मा खान तसेच बनावट पदव्यांचा मास्टरमाइंड व कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान यालाही आरोपी करून अटक केली. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दुसऱ्या एका प्रकरणात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून बी.ए., एम.ए. आणि बी.एड.ची बनावट व खोटी पदवी प्रमाणपत्रे तयार करून कोहिनूर महाविद्यालयातच मराठी व मानसशास्त्र विषयाच्या अंशतः अनुदानित पूर्णवेळ सहशिक्षकपदावर शेख मोहम्मद हफीज उर रहेमान याला नियुक्ती दिल्याप्रकरणी पोलिसांनी शेख मोहम्मद हफीज याच्यासह प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे या दोघांना शुक्रवारी बेड्या ठोकल्या. डॉ. शंभर अंभोरे हा स्वाभिमानी मुप्टा या शिक्षक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असून त्याच्या अटकेमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कोहिनूर शिक्षण संस्था आणि खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाशी संबंधित पदाधिकारी आणि प्राध्यापकांकडेच बनावट आणि खोट्या पदव्या आढळून आल्यामुळे हे एक मोठे रॅकेटच असल्याचा पोलिसांना संशय असून कोहिनूर महाविद्यालयात आणखी किती जणांनी बोगस पदव्यांच्या आधारे नोकऱ्या मिळवल्या याचा शोध पोलिस घेत आहेत.
या बोगस पदव्यांच्या शोधासाठी सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आणि सहायक तपास अधिकारी अजित दगडखैर यांनी छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) डॉ. रणिजितसिंह निंबाळकर यांना ४ एप्रिल व ८ एप्रिल रोजी दोन पत्रे लिहून कोहिनूर महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदव्यांची पडताळणी करण्यास सांगितले.
या दोन पत्रांच्या आधारे विभागीय सहसंचालकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरूंना ९ एप्रिल रोजी पत्र लिहून सविस्तर माहिती सादर करण्यास सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन पत्र लिहूनही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्यामुळे पोलिस उपनिरीक्षक अजित दगडखैर यांनी १५ एप्रिल रोजी विभागीय सहसंचालकांना पुन्हा पत्र लिहून एम.फिल. व पीएच.डी.च्या संशयास्पद पदव्या असलेल्या १२ प्राध्यापकांच्या नावाची यादीच कळवली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे या प्रकरणाचा तपास करत असून पोलिस उपनिरीक्षक अजित दगडखैर हे सहायक तपास अधिकारी म्हणून काम पहात आहेत.
कोणत्या विषयाचे किती प्राध्यापक ‘बोगस’?
पोलिसांनी विभागीय सहसंचालकांना कळवलेल्या यादीनुसार कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असलेल्यांपैकी इंग्रजी विषयातील दोन, रसायनशास्त्र विषयातील दोन, भौतिकशास्त्र विषयातील दोन आणि गृहशास्त्र, लोकप्रशासन, इतिहास, भूगर्भशास्त्र य विषयातील प्रत्येकी एका सहयोगी प्राध्यापकासह शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपालाची एम.फिल. अथवा पीएच.डी.ची पदवी बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी या यादीसोबत या सहायक प्राध्यापकांच्या एम.फिल. आणि पीएच.डी. पदवीच्या छायांकित प्रतीही जोडून दिल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले. न्यूजटाऊनकडे ही यादीच उपलब्ध आहे, परंतु तपास प्रक्रियेत अडथळा नको म्हणून ही नावे प्रकाशित करणे हेतुतः टाळले आहे.
कोणत्या विद्यापीठाच्या पदव्या संशयास्पद?
ज्या सहायक प्राध्यापकांच्या एम.फिल. अथवा पीएच.डी.च्या पदव्या बनावट आणि खोट्या असल्याचा पोलिसांना संशय आहे त्या सहायक प्राध्यापकांच्या एम.फिल. आणि पीएच.डी. च्या पदव्या छत्तीसगडमधील रायपूर येथील यूनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तामिळनाडूतील पलकलाईनगर येथील मदुराई कामराज यूनिव्हर्सिटी, तामिळनाडूतील काराईकुडी येथील अलगप्पा यूनिव्हर्सिटीच्या आहेत.
बहुतांश सहायक प्राध्यापकांकडे रायपूर येथील यूनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या पदव्या आहेत. या पदव्या बनावट व खोट्या असल्याचा संशय असल्यामुळे संबंधित विद्यापीठांकडून या पदव्यांची पडताळणी करून त्याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे पोलिस उपनिरीक्षक अजित दगडखैर यांनी विभागीय सहसंचालकांना बजावले आहे.
‘त्या’ नावाचे विद्यापीठच अस्तित्वात नाही!
कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ज्या सहायक प्राध्यापकांनी रायपूरच्या यूनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या पदव्या जोडून नोकरी मिळवली आहे, त्यांच्या पदव्यांची पोलिस आणि विभागीय सहसंचालकांच्या पातळीवर पडताळणी होईलच परंतु न्यूजटाऊनने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अधिकृत संकेतस्थळावर मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या यादीत यूनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा शोध घेतला असता असे कुठलेही खासगी किंवा अभिमत विद्यापीठ अस्तित्वातच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
रायपूरमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी नावाचे एक महाविद्यालय आहे. त्याच्या संकेतस्थळावर सिव्हिल कोर्टाच्या मागे, देवभोग रोड, गरियाबंद जि. रायपूर असा पत्ता देण्यात आलेला आहे. हे महाविद्यालय पं. रविशंकर शुक्ला विद्यापीठाशी संलग्न दाखवण्यात आलेले आहे. म्हणजेच ते स्वतंत्र खासगी किंवा अभिमत विद्यापीठ नाही. त्यामुळे ज्या सहायक प्राध्यापकांनी यूनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या पदव्या जोडल्या आहेत, त्या खऱ्या कशा?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

