‘स्वाभिमाना’चा चुथडा: मराठी लिहिता-वाचताही न येणाऱ्याला बोगस पदव्यांच्या आधारे अध्यापकाची नियुक्ती दिल्याप्रकरणी प्रा. डॉ. शंकर अंभोरे गजाआड


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे अध्यक्ष आणि खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे मान्यता रद्द केलेले प्राचार्य प्रा. डॉ. शंकर अंभोरे यांना बनावट आणि खोट्या पदव्यांवर एका व्यक्तीला कनिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ शिक्षकाची नोकरी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या उमेदवाराला धड मराठी लिहिता किंवा वाचताही येत नाही, अशा उमेदवाराला पूर्णवेळ अध्यापकपदावर नियुक्ती देण्यात प्रा, डॉ. अंभोरे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे कोहिनूर महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या बनावट पदव्यांवर एका व्यक्तीला नियुक्ती देण्यात आल्याचा पर्दाफाश न्यूजटाऊनने ३ एप्रिल रोजी केला होता.

 पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून बनावट व खोट्या एम.फिल. च्या पदव्या तयार करून २०२१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेट परीक्षेतून सूट मिळवून पीएच.डी. ला प्रवेश घेतल्याप्रकरणी कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव अस्मा खान व सहसचिव पठाण मकसूद खान यांच्या विरोधात २६ मार्च रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आस्मा खानला अटक केल्यानंतर पोलिसांनी कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खानलाही आरोपी करून अटक केली होती.

हेही वाचाः उच्च शिक्षणमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये बोगस प्रवेश दाखवून तयार केल्या शिवाजी विद्यापीठाच्या बनावट पदव्या आणि कोहिनूर महाविद्यालयात मिळवली नोकरी!

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयात ‘बोगस’ प्राध्यापक किती?, पोलिसांनी मागवली सहसंचालकांकडून सगळ्यांचीच माहिती; सहसंचालकांचे विद्यापीठाला पत्र

या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच कोहिनूर कनिष्ठ महाविद्यालयात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए., एम.ए. आणि बी.एड. च्या बनावट व खोट्या पदव्यांच्या आधारे मराठी व मानसशास्त्र विषयाच्या अंशतः अनुदानित पूर्णवेळ सहशिक्षकपदावर शेख मोहम्मद हफीज उर रहेमान याला नियुक्ती देण्यात आल्याच्या प्रकरणाचा न्यूजटाऊनने भंडाफोड केला होता. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) विभागीय शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनी ११ एप्रिल रोजी पोलिस आयुक्तांकडे फिर्याद दिली होती.

या फिर्यादीवरून पोलिसांनी शेख मोहम्मद हफीज उर रहेमान याला आधी बेड्या ठोकल्या. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. बोगस पदव्यांच्या आधारे कोहिनूर कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी देण्यासाठी कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान आणि प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांनीच मदत केल्याचा जबाब शेख मोहम्मद हफीज उर रहेमान याने पोलिसांना दिला.

हेही वाचाः आणखी एक ‘चारसौ बीसी’: ‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान  यांची डीवाय पाटील विद्यापीठाची एमफिल पदवीही बोगस!

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयात १२ वर्षांपूर्वीच बोगस पदव्यांवर तीन जणांनी मिळवली सहायक प्राध्यापकाची नोकरी, ‘दयावान’ विद्यापीठाने केली फक्त मान्यता रद्द!

शेख मोहम्मद हफीज उर रहेमान दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी प्रा. डॉ. शंकर अंभोरेला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याच्या पेठेनगर येथील घरातून उचलले आणि चौकशीनंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे करीत आहे. त्यांच्या मदतीला सिटी चौकचे पोलिस उपनिरीक्षक अजित दगडखैर यांच्यासह इतर टीम कार्यरत आहे.

हेही वाचाः डीपीयूच्या बोगस एमफिलवरच ‘पेट’ला कट मारून आस्मा व मकसूद खानने घेतला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठात पीएचडीला प्रवेश!

हेही वाचाः कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खानविरुद्ध बेगमपुरा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल, पीएचडीचे प्रवेशही रद्द करणार

मराठीच्या शिक्षकाला न वाचता येते ना लिहिता..

कोहीनूर शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात मराठी व मानसशास्त्र विषयाच्या अंशतः अनुदानित पूर्णवेळ सहशिक्षक म्हणून मोहंमद हाफीज उर हमान मोहंमद मोईनोद्दीन याला नोकरी मिळालेली आहे. त्याच्याकडे कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए., एम.ए., बी.एड. (मराठी आणि मानसशास्त्र) अशा विविध बोगस पदव्या आढळल्या आहेत. याच बोगस पदव्यांच्या आधारे त्याने नोकरी मिळवली. विशेष म्हणजे त्याला मराठी लिहिता किंवा वाचताही येत नाही, असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले.

हेही वाचाः बोगस एमफिल पदवीच्या आधारे पीएचडीला प्रवेश मिळवल्याप्रकरणी ‘कोहिनूर’च्या सचिव आस्मा खान गजाआड; रमजान ईद पोलिस कोठडीतच!

हेही वाचाः बोगस एमफिलवर बायको-भावाच्या पीएचडी प्रवेशप्रकरणी ‘कोहिनूर’चा अध्यक्ष डॉ. मझहर खान गजाआड, तरीही विद्यापीठात पाठराखण करणारा ‘विष्णू’आका कोण?

मोहंमद हाफीज उर हमान मोहंमद मोईनोद्दीन याच्याप्रमाणे कोहिनूर महाविद्यालयात अशा बोगस पदव्यांच्या आधारे किती जणांना नियुक्त्या देण्यात आल्या आणि त्यात संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मान्यता रद्द केलेला प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांची कशी आणि कोणती भूमिका राहिली आहे? याचा तपास पोलिस करत असून यातून एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!