
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): एम.फिल.ची बनावट व खोटी पदवी तयार करून त्याआधारे पेटमधून सूट मिळवून पीएच.डी.ला प्रवेश मिळवल्याप्रकरणी अटकेत असलेला कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान आणि सचिव आस्मा खान यांच्या खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तीन जणांनी बनावट व खोट्या पदव्यांच्या आधारे सहायक प्राध्यापकाची नोकरी मिळवल्याचा पर्दाफाश १२ वर्षांपूर्वीच झाला होता. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रशासन ‘दयावान’ बनले आणि या तीन जणांची मान्यता रद्द करून त्यांना अभय देण्यात आले. त्यामुळेच डॉ. मझहर खान आणि आस्मा खान यांची भीड चेपली तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून तयार केलेल्या बनावट व खोट्या एम.फिल. पदवीच्या आधारे कोहिनूर शिक्षण संस्थेची सचिव आस्मा खान आणि सहसचिव पठाण मकसूद खान या दोघांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २०२१ च्या पेट परीक्षेतून सूट मिळवून पीएच.डी.ला प्रवेश मिळवला. या दोघांकडे असलेल्या एम.फिल.च्या पदव्या बनावट व खोट्या असल्याचे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने कळवल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या दोघांच्या विरोधात बेगमपुरा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या आस्मा खान आणि बनावट पदव्यांचा मास्टरमाइंड मझहर खान न्यायालयीन कोठडीत आहेत तर पठाण मकसूद खान फरार आहे.
आस्मा खान व मकसूद खान यांच्या बनावट व खोट्या पदव्यांचे प्रकरण आता उजेडात आले असले तरी कोहिनूर शिक्षण संस्था आणि कोहिनूर महाविद्यालयाला बनावट व खोट्या पदव्यांची कीड फार पूर्वीच लागलेली आहे. २०१२ मध्येच डॉ. मझहर खान याने तीन जणांना बनावट व खोट्या पीएच.डी. च्या आधारे आपल्या महाविद्यालयात सहायक प्राध्यापकाची नोकरी दिली होती. त्याचे पुरावेच न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत.
श्रीमती एस. आय. जाधव, सय्यद खुदूस सय्यद हकीम पाशा आणि इम्तियार खान युसुफ खान या तिघांनी जुलै २०१२ मध्ये मेघालयातील सिलाँगच्या सीएमजे विद्यापीठाची बनावट व खोटी पीएच.डी.ची पदवी मिळवली. या बनावट व खोट्या पीएच.डी. पदवीच्या आधारे कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इम्तियार खान युसुफ खान याची २ जुलै २०१२ रोजी प्राणीशास्त्र विषयातील सहायक प्राध्यापकपदी तर श्रीमती एस.आय. जाधव व सय्यद खुदूस सय्यद हकीम पाशा या दोघांची रसायनशास्त्र विषयातील सहायक प्राध्यापकपदी १ ऑगस्ट २०१२ रोजी नियुक्ती करण्यात आली होती.
बनावट व खोट्या पीएच.डी. पदवीच्या आधारे श्रीमती एस. आय. जाधव, सय्यद खुदूस सय्यद हकीम पाशा आणि इम्तियार खान युसुफ खान यांना सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती दिल्यानंतर कोहिनूर महाविद्यालयाने ९ सप्टेंबर २०१२ रोजी या तिघांच्याही मान्यतेचा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पाठवला आणि विद्यापीठाने कोणतीही खातरजमा न करताच २५ सप्टेंबर २०१२ रोजी या तिघांच्याही नियुक्त्यांना मान्यता देऊन टाकली. विद्यापीठाने मान्यता दिल्यानंतर विभागीय सहसंचालक कार्यालयाने शासकीय तिजोरीतून त्यांची वेतन अदायगी सुरू करून टाकली.
श्रीमती एस. आय. जाधव, सय्यद खुदूस सय्यद हकीम पाशा यांच्या नियुक्तीला १२ महिने आणि इम्तियार खान युसुफ खान याच्या नियुक्तीला १३ महिने उलटून गेल्यानंतर या तिघांकडेही असलेल्या मेघालयातील सिलाँग येथील जीएमजे विद्यापीठाच्या पीएच.डी. च्या पदव्या बनावट आणि खोट्या असल्याचे राज्य सरकारने ३ जून २०१३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला कळवले.
पोलिसांत फिर्याद का दिली नाही?
राज्य सरकारचे पत्र प्राप्त झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे तत्कालीन संचालक आणि राज्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विभागाचे विद्यमान संचालक डॉ. धनराज माने यांनी या तिघांनाही विद्यापीठाने दिलेली मान्यता रद्द केली आणि या तिघांची सहिसलामत सुटका करण्यात आली.
खरे तर राज्य सरकारचे पत्र प्राप्त होताच या तिघांनी विद्यापीठ व राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत फिर्याद देऊन गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते. परंतु विद्यापीठ प्रशासन ‘दयावान’ बनले आणि मान्यता रद्द करण्याच्या जुजबी कारवाईवर कोहिनूर शिक्षण संस्थेसह या तिघांनाही अभय देण्यात आले.
डॉ. धनराज माने किंवा विद्यापीठ प्रशासनाने तेव्हाच या तिघांबरोबर कोहिनूर शिक्षण संस्थेच्या विरोधात पोलिसांत फिर्याद का दिली नाही? फक्त मान्यता रद्द करण्याची जुजबी कारवाईच का केली? बोगस पदव्यांच्या आधारे फसवणूक करणारे हे तिघे जण आणि त्याच बोगस पदव्यांच्या आधारे त्यांना नोकरी देणारे कोहिनूर शिक्षण संस्थेचे संचालक यांना अभय देण्यामागे कोणाचे हितसंबंध गुंतले होते? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

सहसंचालक कार्यालयाचीही मेहरनजर!
एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केवळ मान्यता रद्द करून श्रीमती एस. आय. जाधव, सय्यद खुदूस सय्यद हकीम पाशा आणि इम्तियार खान युसुफ खान या तिघांची सहिसलामत सुटका करून टाकली तर दुसरीकडे विभागीय सहसंचालक कार्यालयानेही या तिघांवर मेहरनजर दाखवली. श्रीमती एस. आय. जाधव, सय्यद खुदूस सय्यद हकीम पाशा या दोघांनी १२ महिने आणि इम्तियार खान युसुफ खान याने १३ महिने शासनाच्या तिजोरीतून वेतन लाटले.
विद्यापीठाने या तिघांची मान्यता रद्द केल्यानंतर विभागीय सहसंचालक कार्यालयाने तातडीने या तिघांनी लाटलेल्या वेतनाच्या वसुलीची कारवाई करणे अनिवार्य होते. परंतु १२ वर्षे उलटले तरी तशी कोणतीच कारवाई विभागीय सहसंचालक कार्यालयाने केली नाही. विशेष म्हणजे विभागीय सहसंचालक कार्यालयाने कोहिनूर महाविद्यालयाचे २०१६ आणि २०२४ मध्ये दोन वेळा अनुदान निर्धारण केले. त्या अनुदान निर्धारणात या तिघांनी लाटलेल्या वेतन अनुदान वसुलीबाबत कुठेच चकार शब्दही काढण्यात आला नाही.
डॉ. धनराज मानेंसह दोषींविरुद्ध कारवाई करा
श्रीमती एस. आय. जाधव, सय्यद खुदूस सय्यद हकीम पाशा आणि इम्तियार खान युसुफ खान या तिघांनी बनावट व खोट्या पीएच.डी. पदवीच्या आधारे नोकरी मिळवून फसवणूक केलेली असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे तत्कालीन संचालक आणि राज्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विभागाचे विद्यमान संचालक डॉ. धनराज माने यांनी गुन्हे दाखल न करता कोहिनूर शिक्षण संस्थेसह या तिघांचीही कायदेशीर कारवाईच्या कचाट्यातून सुटका करून कर्तव्यात गंभीर कसूर केली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय सहसंचालक कार्यालयातील अनुदान निर्धारण पथकानेही शासकीय निधीच्या अपव्ययाकडे हेतुतः दुर्लक्ष केलेले असल्यामुळे डॉ. धनराज मानेंसह विभागीय सहसंचालक कार्यालयातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी रिपाइंचे (आठवले) शहर-जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रधान सचिव आणि पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

