संभाजीनगरातील तणाव निवळला, परिस्थिती नियंत्रणातः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती


नागपूरः छत्रपती संभाजीनगरमधील (औरंगाबाद) तणाव निवळला आहे. परिस्थिती नियंत्रणात असून आम्ही लक्ष ठेवून आहोत. सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात तरूणांच्या दोन गटात मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर जाळपोळ, दगडफेक आणि हाणामारीत झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार, अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला होता. या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात टीव्ही९ वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचाः छत्रपती संभाजीनगरः किराडपुऱ्यात मध्यरात्री जाळपोळ, दगडफेक; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात

संभाजीनगरमधील तणाव आता निवळला आहे. आम्ही त्याकडे लक्ष ठेवून आहोत. खबरदारीचा उपाय म्हणून संभाजीनगरमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तणाव निर्माण होईल, असे वर्तन कोणीही करू नये, सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे.

हे सरकारचे अपयश-राऊतः दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीनगरातील घटनेवर प्रतिक्रिया दिली. राज्यात अशांतता निर्माण करणे हा शिंदे सरकारचा एकमेव हेतू आहे. त्यामुळे आज दंगली होत आहेत, असे राऊत म्हणाले.

मुळात राज्यात गृह मंत्रालय अस्तित्वात आहे की नाही? हा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस निराश, वैफल्यग्रस्त परिस्थितीत काम करत आहेत. याची कारणे शोधावी लागतील. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी सातत्याने दिसते. काल संभाजीनगरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. हे सरकारचे अपयश आहे. राज्यात असे वातावरण निर्माण व्हावे, ही सरकारची इच्छा आहे. त्यासाठी मिंधे गटाच्या अनेक टोळ्यात काम करत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!