ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन, देशाच्या सामाजिक-राजकीय चळवळीतील ७ दशकांच्या स्थित्यंतराचा ध्येय्यनिष्ठ साक्षीदार हरपला!


सोलापूरः समाजसेवा आणि समाजसुधारणा हेच जीवनाचा श्वास आणि ध्यास मानलेले ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे मंगळवारी रात्री नळदुर्ग येथील ‘अपना घर’ निवासस्थानी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. मंगळवारी रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाल्यानंतर त्यांना तत्काळ सोलापूर येथील एका सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याआधीच त्यांचे निधन झाले.

आयुष्यभर समाजवादी विचारांची पताका गौरवाने मिरवणारा, अनेक लोकचळवळीत सहभाग घेणारा, सत्तेच्या पदासाठी कधीही आग्रह न धरणारा, निस्पृह व निस्वार्स्थी लोकनेता अशी पन्नालाल सुराणा यांची ओळख होती. सत्तरहून अधिक वर्षे ते देशाचे राजकारण आणि समाजकारणाच्या स्थित्यंतराचे साक्षीदार राहिले आहेत. चले जाव आंदोलनापासून ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत आणि त्यानंतर स्वातंत्र्य ते आणीबाणी तसेच देशाच्या सामाजिक व राजकीय जडणघडणीचा महत्वाचा अनुभव पन्नालाल सुराणा यांच्याकडे होता.

९ जुलै १९३३ रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे पन्नालाल सुराणा यांचा जन्म झाला होता. बार्शीतील शाळेत शिकत असतानाच ते साने गुरूजींनी स्थापन केलेल्या राष्ट्रसेवा दलात सामील झाले. पुढे तरूणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभाग घेतला. बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील प्रवासाची सुरूवात झाली. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवासही भोगला. समाजकारण, राजकारण, शिक्षण, शेती आणि बेरोजगारी यासारख्या महत्वाच्या विषयांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केले. ग्यानबाचे अर्थकारण हे त्यांचे पुस्तक अनेकांना प्रेरणा देणारे ठरले आहे.

जुना समाजवादी पक्ष, जनता पक्ष, अनेक पुरोगामी संघटना आणि जनआंदोलनांच्या उभारमीत पन्नालाल सुराणा यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांचे सामाजिक कामही लक्षणीय आहे. मराठवाड्यातील लातूर-उस्मानाबाद येथील भूकंपात सर्वस्व गमावलेल्यांसाठी पन्नालाल सुराणा यांनी ‘अपना घर’ सुरू केले. याच अपना घरमधून अनेक मुलामुलींचे आयुष्य घडले आहे. भूमीहीन शेतकऱ्यांना जमिनी मिळवून देण्यासाठीही त्यांनी संघर्ष केला. १९८६ मध्ये ते तत्कालीन औरंगाबादेतून प्रकाशित होणाऱ्या मराठवाडा दैनिकाचे संपादक झाले. १९८६ ते ९३ या काळात ते दैनिक मराठवाडाचे संपादक होते.

पन्नालाल सुराणा यांनी राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवर ४० पुस्तके लिहिली.  दुष्काळ निवारण, निर्मूलन, शेतकरी-शेतमजुरांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलने केली. आणीबाणीच्या काळात ते भूमिगत होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. भूमिमुक्ती आंदोलनात त्यांना चार वेळा तुरुंगवास झाला. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केलं.

पन्नालाल सुराणा यांनी बार्शीतून विधानसभेची तर सोलापूरमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. बार्शीच्या माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांच्याविरुद्ध ते विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. राजकारणात त्यांना मोठ्या संधी असतानाही केवळ जनतेने आपल्याला नाकारले म्हणून त्यांनी मंत्रिपद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता.

संपूर्ण आयुष्य समाजासाठी देणाऱ्या पन्नालाल सुराणा यांनी निधनानंतर शासकीय रुग्णालयास देहदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे पार्थिव आज सोलापूरच्या डॉ.व्ही.एम. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!