समृद्धी महामार्गावरून जाताय?, तुमच्या गाडीला ‘असे’ टायर असतील तर भरावा लागू शकतो २० हजार रुपये दंड!


नागपूरः सुसाट वेगासाठी प्रसिद्ध होत असलेल्या नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचा वापर वाढल्यापासून अपघातांचे प्रमाणही वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच या महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही  केली जात आहे. समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून अतिवापर झाल्यामुळे घासलेले टायर असलेली वाहने समृद्धी महामार्गावरून धावताना आढळली तर २० हजार रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो.

समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने वेगाची मर्यादा निश्चित केली असून इतरही नियम लागू केले आहेत. समृद्धी महामार्गावर झालेले बहुतांश अपघात हे वाहनांचे टायर फुटल्यामुळे झाल्याचे समोर आल्यानंतर आता आरटीओने समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेण्यास सुरूवात केली आहे.

आरटीओने अतिवापर झाल्यामुळे घासलेले टायर असलेली वाहने समृद्धी महामार्गावर धावताना आढळली तर त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. गुरूवारी आरटीओने अशा तीन वाहनांना प्रत्येकी २० हजार रुपये दंड ठोठावला आहे.

समृद्धी महामार्गाचा वापर सुरू झाल्यापासूनच या महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. आतापर्यंत या महामार्गावर झालेल्या अपघातात ३६ हून जास्त जणांना प्राणास मुकावे लागले आहे. या महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता ते टाळण्यासाठी आता विशेष प्रयत्न केले जात आहेत.

आरटीओने अतिवापर झाल्यामुळे घासलेले टायर असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. ट्रेड डेप्थ ऍनालायझरच्या साह्याने समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांच्या टायरची तपासणी केली जात आहे. या तपासणीदरम्यान गुरूवारी तीन वाहनांचे टायर जास्त घासलेले आढळल्यामुळे या वाहनांवर प्रत्येकी २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नागपूर-मुंबई हा प्रवास द्रूतगतीने करून प्रवासाची वेळ कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाची बांधणी केली जात आहे. ११ डिसेंबर २०२२ रोजी हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. त्या दिवसापासूनच त्यावर होणारे अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे. समृद्धी महामार्गावरून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांचे टायर फुटल्यामुळे बहुतांश अपघात झाले आहेत.

या महामार्गावर अचानक जनावरे समोर आल्यास त्यांना वाचवण्याच्या नादातही अपघात होत आहेत.  त्यामुळे अपघात टाळण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून या महामार्गावरील वाहनांच्या टायरची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!