
पुणे/लातूरः देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट यूजी-२०२६ पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लातूर येथील प्रसिद्ध ‘आरसीसी’ म्हणजेच रेणुकाई करिअर सेंटरचे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना पुण्यातून अटक केली. रविवारी (१७ मे) सायंकाळी ७.१५ वाजता ही कारवाई करण्यात आली. सीबीआयच्या या कारवाईमुळे नीट आणि जेईईचे खासगी क्लासेस चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात खोलवर पोहोचलेले आहेत. सीबीआयने पुणे, नांदेड आणि लातूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेकांची चौकशी केली. सीबीआयने १४ मे रोजी आरसीसीचे संचालक शिवराज मोटेगावकर यांची सुमारे नऊ तास चौकशी केली होती. त्या चौकशीत मोटेगावकर यांचा नीट पेपरफुटी प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर रविवारी सीबीआयने त्यांना पुण्यातून ताब्यात घेतले.
आरसीसीचे संचालक शिवराज मोटेगावकर हे नीट पेपर फोडणाऱ्या एका संघटित टोळीचे सक्रीय सदस्य असल्याचे समोर आले आहे. ३ मे २०२६ रोजी होणाऱ्या नीट परीक्षेच्या आधीच २३ एप्रिल २०२६ रोजीच त्यांनी नीट यूजी परीक्षेचे प्रश्न आणि उत्तरे मिळवली होती. १४ मे रोजी लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी केलेली चौकशी आणि घेतलेल्या झडतीदरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये फोडण्यात आलेले प्रश्न आढळून आले, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.
शिवराज मोटेगावकर यांनी ही प्रश्नपत्रिका अनेक व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना पुरवली असल्याचा सीबीआयला संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे परीक्षा झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी संबंधित प्रश्नपत्रिका नष्ट केल्याचेही सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा पेपर पुरवण्यात आला, त्यांची नावे सांगण्यास मोटेगावकर यांनी चौकशीदरम्यान टाळाटाळ केली.
शिवराज मोटेगावकर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारांना प्रतिबंध) कायदा २०२४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि परीक्षेत गैरप्रकार घडवून आणणे असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी पी.व्ही. कुलकर्णी हा लातूरचा आहे. त्यामुळे पी.व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्यात आपआपसात घनिष्ठ संबंध होते. दोघांनी मिळून पेपरफुटीचा कट रचला असे सीबीआयच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले.
सीबीआयचे पथक सध्या लातूरमधील आरसीसी क्लासेसच्या कार्यालयाचा तपास करत आहे. या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे. आरसीसीबाहेर स्थानिक पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही महत्वाचे पुरावे आणि धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागले असल्याची चर्चा आहे.
मोटेगावकरला १० दिवस सीबीआय कोठडी
आरसीसी क्लासेसवर टाकलेल्या छाप्यात सीबीआयने मोबाईल, लॅपटॉप आणि काही प्रश्नसंच जप्त केले आहेत. तपासादरम्यान मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये संबंधित प्रश्नपत्रिका आढळून आली होती. परंतु सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर मोटेगावकर यांनी मोबाईलमधील डेटा डिलिट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. फॉरेन्सिक तपासातून हा डेटा पुन्हा मिळवण्यात आल्याचे सीबीआयने विशेष सीबीआय न्यायालयात सांगितले. संपूर्ण रॅकेटमधील आर्थिक व्यवहार, प्रश्नपत्रिकांचा पुरवठा आणि इतर आरोपींची भूमिका याचा तपास सुरू असल्याने मोटेगावकरांना १० दिवस सीबीआय कोठडी देण्याची मागणी सीबीआयने केली. विशेष सीबीआय न्यायालयाने ती मान्य केली.
होम ट्यूशनपासून सुरूवात
लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यात सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवराज मोटेगावकर यांनी घरची परिस्थिती बेतीच असल्यामुळे शिक्षणासाठी ते लातूरला बहिणीकडे रहायला आले. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच घरखर्च आणि शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी होम ट्यूशन सुरू केली होती. पुढे उमरगा आणि लातूर महाविद्यालयांमध्ये त्यांनी तासिका तत्वावर प्राध्यापक म्हणून काम केले.
२००३ मध्ये त्यांनी रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसची सुरूवात केली. पुढे त्याच क्लासेसचा रेणुकाई करिअर सेंटर असा विस्तार करण्यात आला. सुरूवातीला केवळ केमिस्ट्री शिकवणारे मोटेगावकर यांनी पुढे सर्व विषय एकाच ठिकाणी शिकवण्याची संकल्पना राबवली. त्यातून आरसीसी पॅटर्नचा विस्तार झाला. सुरूवातीला केवळ एमएट-सीईटीसाठी कोचिंग देणाऱ्या मोटेगावकरांनी पुढे नीट आणि जेईईसाठी कोचिंग देणे सुरू केले. नंतर मोटेगावकरांनी छत्रपती संभाजीनगर, नांदेड, पुणे, नाशिक इत्यादी शहरांत आरसीसीच्या शाखा सुरू केल्या. आरसीसीचे कोट्यवधी रुपयांचे साम्राज्य मोटेगावकरांनी उभे केले आहे. आता तेच साम्राज्य पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
