
छत्रपती संभाजीनगरः महाराष्ट्र विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार आणि विद्यमान आमदार सतीश चव्हाण आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यात चुरशीची लढत होत असून प्रथम पसंतीक्रमाच्या मतमोजणीच्या तीन फेऱ्यात डॉ. पाटील यांनी लक्षणीय आघाडी घेतली असली तरी कोटा पूर्ण न झाल्यामुळे आता दुसऱ्या पसंतीक्रमाची मते या निवडणूक निकालाचा गेम पलटवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेत तिसऱ्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. तिसऱ्या फेरीअखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ७३ हजार ९३१ मते मिळाली आहेत. तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांना ६० हजार ७६८ मते मिळाली आहेत. पहिल्या पसंतीक्रमाच्या तिसऱ्या फेरीअखेर डॉ. पाटील हे १३ हजार १६३ मतांनी आघाडीवर आहेत. रविराज साबळे हे १४ हजार ५९८ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आघाडी घेतल्यामुळे प्रथम पसंतीक्रमाच्या मतांवरच ते विजयी होतील, असा अंदाज बांधला जाऊ लागला होता. परंतु प्रथम पसंतीक्रमाच्या मतांवर एकही उमेदवार विजयाचा कोटा पूर्ण करू शकला नाही. पहिल्या पसंतीक्रमाच्या तीन फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी हाती घेण्यात आली आहे.
विजयासाठी ८८ हजार ५५९ मतांचा कोटा
या निवडणुकीत विजयासाठी ८८ हजार ५५९ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या पसंतीक्रमाच्या तीन फेऱ्यात हा कोटा पूर्ण झाला नसल्यामुळे आता दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी हाती घेण्यात आली आहे. दुसऱ्या पसंतीक्रमाची मतेच या निवडणूक निकालाचे भवितव्य ठरवतील. राजकीय विश्लेषकांच्या मते डॉ. प्रतापसिंह पाटील यांना पहिल्या पसंतीचे मत देणाऱ्या बहुतांश मतदारांनी दुसऱ्या पसंतीक्रमाचे मत आ. सतीश चव्हाण यांना दिले आहे. त्यामुळे दुसऱ्या पसंतीक्रमाची मोजणी पूर्ण होईल, तेव्हा सध्या समोर आलेले निवडणूक निकालाचे चित्र पालटण्याचीच जास्त शक्यता आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हानिहाय मतदानाच्या आकडेवारीनुसार धाराशिव जिल्ह्यात ६२.५३ टक्के, परभणी जिल्ह्यात ६१.८१ टक्के, हिंगोली जिल्ह्यात ६१.५८ टक्के, जालना जिल्ह्यात ५९.८१ टक्के, नांदेड जिल्ह्यात ५९.८१ टक्के, बीड जिल्ह्यात ५९.६८ टक्के, लातूर जिल्ह्यात ५६.४५ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५५.७३ टक्के मतदानाची नोंद झाली.
मतदानाच्या संख्येनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५२ हजार ७, जालना जिल्ह्यात १९ हजार ८५३, परभणी जिल्ह्यात १६ हजार ४८२, हिंगोली जिल्ह्यात ६ हजार ३५२, नांदेड जिल्ह्यात २१ हजार ९४२, लातूर जिल्ह्यात २२ हजार ४१२, धाराशिव जिल्ह्यात १८ हजार २२५, तर बीड जिल्ह्यात ३४ हजार ४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
८ जिल्ह्यातील ८४२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले होते. या मतपेट्यांच्या मतमोजणीसाठी ७० टेबल लावण्यात आले असून १३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार या मतदारसंघात एकूण १ लाख ९१ हजार ६८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची सरासरी टक्केवारी ५८.६७ टक्के एवढी आहे. एकूण ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून या मतदारसंघातून सलग तीन टर्म विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) डॉ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची झाली आहे.
