Election Result Updates: मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आ. सतीश चव्हाण ५ हजार मतांनी पिछाडीवर; डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर


छत्रपती संभाजीनगरः महाराष्ट्र विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार आणि विद्यमान आमदार सतीश चव्हाण आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यात चुरशीची लढत होत असून पहिल्या फेरीत आतापर्यंत मतमोजणी झालेल्या मतांमध्ये आ. सतीश चव्हाण हे ५ हजार मतांनी पिछाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेत आतापर्यंत पहिल्या फेरीत ५० हजार मतांची मोजणी पूर्ण झाली असून या मोजणी झालेल्या मतांमध्ये विद्यमान आमदार सतीश चव्हाण हे ५ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आघाडी घेतली आहे.

दरम्यान टपाली मतांची मोजणी पूर्ण झाली असून ४९४ वैध टपाली मतांपैकी आ. सतीश चव्हाण यांना १८७, डॉ. प्रतापसिंह पाटील यांना १६९, शिवसेनेचे दिलीप घुगे यांना ४० तर रविराज साबळे यांना ३१ मते मिळाली आहेत.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हानिहाय मतदानाच्या आकडेवारीनुसार धाराशिव जिल्ह्यात ६२.५३ टक्के, परभणी जिल्ह्यात ६१.८१ टक्के, हिंगोली जिल्ह्यात ६१.५८ टक्के, जालना जिल्ह्यात ५९.८१ टक्के, नांदेड जिल्ह्यात ५९.८१ टक्के, बीड जिल्ह्यात ५९.६८ टक्के, लातूर जिल्ह्यात ५६.४५ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५५.७३ टक्के मतदानाची नोंद झाली.

मतदानाच्या संख्येनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५२ हजार ७, जालना जिल्ह्यात १९ हजार ८५३, परभणी जिल्ह्यात १६ हजार ४८२, हिंगोली जिल्ह्यात ६ हजार ३५२, नांदेड जिल्ह्यात २१ हजार ९४२, लातूर जिल्ह्यात २२ हजार ४१२, धाराशिव जिल्ह्यात १८ हजार २२५, तर बीड जिल्ह्यात ३४ हजार ४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केलेल्या १ लाख ९१ हजार ६८९ मतदारांमध्ये १ लाख ५४ हजार ७४८ पुरुष, ३६ हजार ९४० महिला व एका इतर मतदाराचा समावेश आहे. या निवडणुकीत ४१ उमेदवार रिंगणात असून, मतदारांनी मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवून मतदानाचा हक्क बजावला.

८ जिल्ह्यातील ८४२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले होते. या मतपेट्यांच्या मतमोजणीसाठी ७० टेबल लावण्यात आले असून १३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार या मतदारसंघात एकूण १ लाख ९१ हजार ६८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची सरासरी टक्केवारी ५८.६७ टक्के एवढी आहे. एकूण ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून या मतदारसंघातून सलग तीन टर्म विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) डॉ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची झाली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!