मुंबई: अमरावती येथील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सध्या सुरू असून कुलपती तथा राज्यपालांनी स्थापन केलेल्या कुलगुरू शोध समितीने ४३ जणांच्या मुलाखती घेतल्यानंतर ‘टॉप फाईव्ह’ उमेदवारांची नावे बंद लिफाफ्यात कुलपतींकडे पाठवली आहेत. कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस हे येत्या २० जानेवारीला राजभवनात या पाच जणांच्या मुलाखती घेणार आहेत.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून कुलगुरू शोध समितीने ४३ जणांची नावे शॉर्टलिस्ट केली होती. या शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांशी शोध समितीने मुंबईत ११ आणि १२ जानेवारी असे दोन दिवस संवाद साधला आणि त्यांच्याकडून विद्यापीठ विकासाचे व्हिजन जाणून घेतले.
कुलगुरूपदाच्या शर्यतीत उतलेल्या या ४३ जणांचे व्हिजन जाणून घेतल्यानंतर कुलगुरू शोध समितीने या ४३ मधून पाच जणांची नावे बंद लिफाफ्यात राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या स्वाधीन केली आहेत.
शोध समितीने निवडलेल्या ‘टॉप फाईव्ह’मथ्ये नागपूरच्या सी.पी. अॅण्ड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बारहाते, जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्सचे प्राध्यापक डॉ. अशोक महाजन, नांदेडच्या श्री गुरू गोविंद सिंघजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीतील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे प्रा.डॉ. रामचंद्र मंठाळकर, पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. राजेश गच्चे यांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कुलगुरू शोध समितीने ‘टॉप फाईव्ह’मध्ये निवडलेला पाचवा उमेदवार कोण? त्यांच्या नावाबाबत नेमकी स्पष्टता होऊ शकली नाही. विशेष म्हणजे शोध समितीला अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी एकही महिला उमेदवार पात्र वाटला नाही.
या टॉप फाईव्ह उमेदवारांच्या येत्या २० जानेवारीला राजभवनात मुलाखती घेतल्या जाणार आहेत. कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस हे स्वत: या पाच उमेदवारांच्या मुलाखती घेणार असून या पाचही उमेदवारांना मुलाखतीचे स्थळ आणि वेळ ईमेलद्वारे कळवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या मुलाखतींनंतर राज्यपाल तथा कुलपती अमरावती विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंची निवड जाहीर करतील.
१४ दिवस उलटले तरी ‘डॉ.बामु’च्या कुलगुरूंची घोषणा नाही
अमरावती विद्यापीठाशिवाय छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचीही प्रक्रिया सुरू आहे. राज्यपाल तथा कुलपतींनी ४ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी ‘टॉप फाईव्ह’ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
या मुलाखतीनंतर दोन-चार दिवसात नव्या कुलगुरूंच्या निवडीची घोषणा केली जाईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. परंतु या मुलाखती होऊन तब्बल १४ दिवस उलटले तरी नव्या कुलगुरूंच्या निवडीची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी २० जानेवारीला मुलाखती होत असल्या तरी नव्या कुलगुरूंची निवड लगेच जाहीर होण्याची शक्यता कमीच आहे.