Updates-मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूकः राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. सतीश चव्हाण आघाडीवर, शरद पवार गटाचे डॉ. प्रतापसिंह पाटील पिछाडीवर


छत्रपती संभाजीनगरः  मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रिया प्रगतीपथावर असून टपाली मतांच्या मोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आ. सतीश चव्हाण यांनी बाजी मारली असून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील हे २३ मतांनी पिछाडीवर आहेत.

एकूण प्राप्त झालेल्या ५१५ टपाली मतदानापैकी २१ टपाली मते अवैध ठरली. वैध ठरलेल्या ४९४ मतांच्या मोजणीत आ. सतीश चव्हाणांनी आघाडी घेतली असून डॉ. प्रतापसिंह पाटील पिछाडीवर आहेत.

दुपारी ४.३० वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार २७५ टपाली मतांच्या मोजणीत आ. सतीश चव्हाण यांना ११६ तर डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ९३ मते मिळाली आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे यांना २८ मते तर रविराज साबळे यांना १८ टपाली मते मिळाली आहेत. टपाली मतदानात आ. सतीश चव्हाण हे २३ मतांनी आघाडीवर आहेत.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रारंभी टपाली मतपत्रिकांची मोजणी हाती घेण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या एकूण ५१५ टपाली मतपत्रिकांपैकी २१ मतपत्रिका अवैध ठरल्या आहेत. ४९४ टपाली मते वैध ठरवण्यात आली आहेत.

औरंगाबाद विभाग (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता चिकलठाणा एमआयडीसीतील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे प्रारंभ झाला. सकाळी ७.२५ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत व निवडणूक निरीक्षक माधवी खोडे-चावरे आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँगरुम उघडण्यात आली. त्यानंतर मतमोजणी कर्मचाऱ्यांना गोपनीयतेची शपथ देऊन मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात २३ ऑक्टोबर रोजी ८ जिल्ह्यातील ८४२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले होते. या मतपेट्यांच्या मतमोजणीसाठी ७० टेबल लावण्यात आले असून १३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार या मतदारसंघात एकूण १ लाख ९१ हजार ६८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची सरासरी टक्केवारी ५८.६७ टक्के एवढी आहे. एकूण ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून या मतदारसंघातून सलग तीन टर्म विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) डॉ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची झाली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!