
नागपूरः महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली असली तरी निकाल हाती यायला अजून दहा ते बारा तासांचा अवधी लागणार असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आणि सोशल मीडियास्टार नितेश कराळे मास्तरांनी निकाल हाती येण्याआधीच विजयाचा दावा केला आहे. ‘गुलाल आपलाच आहे, तयार रहा बे पोट्टे हो’ अशी पोस्ट करत त्यांनी समाजमाध्यमावर विजयाचा दावा केला आहे. दरम्यान, त्यांनी मतमोजणी प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.
सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय असलेले नितेश कराळे हे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केल्यामुळे त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. तरीही त्यांनी या निवडणुकीत विजयी होण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सुरूवात झाली असली तरी स्पष्ट निकाल हाती यायला मध्यरात्र तर काही मतदारसंघात पहाट उजाडणार असली तरी नितेश कराळे यांनी मात्र निकालाआधीच विजयाचा दावा केला आहे. ‘गुलाल आपलाच आहे, पोट्टे हो तयार रहा…’ अशी पोस्ट त्यांनी समाजमाध्यमावर केली असून सध्या ती तुफान चर्चेचा विषय ठरली आहे. ग्रामीण भागातील मतदारांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
मतमोजणी प्रक्रियेवर गंभीर आक्षेप
एकीकडे विजयाचा दावा करतानाच नितेश कराळे यांनी मतमोजणी प्रक्रियेवरही गंभीर आक्षेप घेतले आहेत. मतमोजणी केंद्रावरील १५ सीसीटीव्ही कॅमेरे दीडतास बंद होते, असा आरोप करत त्यांनी मतमोजणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच आक्षेप नोंदवला आहे. कॅमेरे बंद असल्यामुळे मतपेट्या बदलण्याची किंवा अन्य गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. संबंधित यंत्रणेने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आपल्या उमेदवारीमुळे दोन मोठ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना घाम फुटला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
काँग्रेसचे अभिजीत वंजारी आघाडीवर
दरम्यान, नागपूर पदवीधर मतदारसंघातील टपाली मतपत्रिकेची मोजणी करण्यात आली असून एकूण टपाली मतपत्रिकांपैकी १४ टक्के मतपत्रिका अवैध ठरल्या आहेत. प्राप्त झालेल्या एकूण २३८ टपाली मतपत्रिकांपैकी ३४ टपाली मतपत्रिका अवैध ठरल्या आहेत. वैध ठरलेल्या २०४ मतपत्रिकांपैकी सर्वाधिक मते काँग्रेसचे उमेदवार व विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांना मिळाली आहेत तर भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. वंजारी यांना १०१ तर कोहळे यांना ८६ मते मिळाली. इतर उमेदवारांना २२ मते मिळाली आहेत.
