माता भगिनींवर डाव टाकून फसवण्याचा प्रकार, ‘लाडकी बहीण’ योजनेवर उद्धव ठाकरेंचा घणाघात; आरक्षणावरही भाष्य!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेली पिछेहाट आणि तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या योजनेवर आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित शिवसंकल्प मेळाव्यात या योजनेवर भाष्य केले आहे. माता भगिनींवर डाव टाकून फसवण्याचा प्रकार होत असल्याचे या योजनेचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगरात आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात भाजपचे नेते व माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी सहा माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि महायुती सरकारवर टिकास्त्र सोडले.

लोकसभेच्या निकालानंतर मुंबई बाहेर पडलो आणि शिवसेनाप्रमुखांच्या संभीजीनगरमध्ये पहिल्या प्रथम आलो आहे. संभीजीनगरमध्ये मुद्दाम आलो आहे. जे गद्दार जिंकले आहेत, त्यांना सांगायला आलो आहे की, संभाजीनगर जिंकणार. मोदी सरकारचे उधळेले खेचर ४०० पार करणार होते. आपण त्या खेचराला महाराष्ट्रात ४० वरुन ९वर आणले. आता सर्वजण एकत्र या आणि त्यांना शून्यावर आणा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणुकीमध्ये पापे लपवण्यासाठी आता सरकार योजना आणत आहे. परंतु या योजनेतून घराघरात वितुष्ट आणण्याचा डाव सरकारने आखला आहे. घरातील मुलींना मोफत शिक्षण मग मुलांना मोफत शिक्षण का दिले जात नाही?  असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले की, मुलींसाठी योजना आणता पण घराघरात भाऊ बेकार आहे. त्याचा कधी विचार करणार की नाही? योजना खूप मांडल्या जात आहेत. माता-भगिनींना मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी डाव टाकत आहेत. माताभगिनींवर डाव टाकून फसवण्याचा प्रकार होत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

गळती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन

गळती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. हे पुन्हा गादीवर बसणार नाहीत, याची काळजी आपण घ्यायची आहे. माता-भगिनींना समोर ठेवून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. गेली १० वर्षे मोदी सत्तेत आहेत. गेल्या दहा वर्षांत ज्या योजना जाहीर केल्या त्यापैकी किती योजना अंमलात आणल्या? शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीची घोषणा त्यांनी केली. पण शेतकऱ्यांचे नुसते वीज बिल माफ करू नका.आधी संपूर्ण थकबाकी माफ करा, त्यानंतर वीज बिल माफ करा. थकबाकीवर बोला. थकबाकीसकट वीज बिल माफ करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

गद्दारांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही

आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. लोकसभेची निवडणूक ही देशाची, संविधानाची लढाई आहे. आता येणारी निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची ओळख आहे. महाराष्ट्राची ओळख इतिहासात काय लिहून ठेवायची?, हे ठरवणारी निवडणूक आहे. मी गद्दार, लाचाराचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही, असे ठाकरे म्हणाले.

आरक्षणावर सर्वमान्य तोडगा काढा

या सरकारकडे देण्यासारखे काहीही नाही. फक्त जुमलेबाजी करत आहे. हे सरकार जातीजातीमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. सर्व समाजातील जनतेला मी विनंती करतो की, आपआपसात भांडणे करू नका, तुमच्या सर्वांच्या न्याय्य मागणीबरोबर मी आहे. आरक्षणाबाबतच्या उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वमान्य तोडगा काढा, मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो. मनोज जरांगे पाटलांना बोलवा, लक्ष्मण हाकेंना बोलवा. त्यांना सांगा खरंच आरक्षण मिळते का? त्यांच्या जीवाशी का खेळता?, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यासंदर्भात विधानसभेत ठराव करा, शिवसेना आज तुम्हाला पाठिंबा देत आहे, असेही ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!