छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): माझे हात मंत्रालयापर्यंत पोहोचलेले आहेत. अधिवेशनात मी तुमचा मुद्दा उपस्थित करून तुम्हाला नोकरीतून काढू शकतो. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत तुमची चौकशी लावतो, अशा भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. गजानन सानप यांनी विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉ. आनंद वाघ यांना धमकावले. त्यामुळे भयभीत झालेल्या डॉ. वाघ यांनी आज कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याकडे प्रभारी संचालकपदाचा राजीनामा दिला. दमबाजी करून धमकावणारे डॉ. सानप हे अभाविपचे कार्यकर्ते आहेत.
डॉ. वाघ यांनी कुलसचिवांकडे दिलेल्या राजीनामापत्रात डॉ. गजानन सानप यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. याच राजीनामापत्रात त्यांनी संपूर्ण घटनाक्रम विस्ताराने लिहिला आहे. ‘5 जुलै 2024 रोजी सायंकाळी 4.15 वाजता प्र-कुलगुरूंनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यामार्फत मला त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यांच्या कक्षात आगोदर व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य डॉ. गजानन सानप बसलेले होते. मला पाहिल्याबरोबर त्यांनी दबावात्मक भाषेत बोलण्यास सुरूवात केली,’ असे डॉ. आनंद वाघ यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.
‘तुम्ही महाविद्यालयांना विस्तार युनिट देताना टक्केवारी घेता, तुम्ही महाविद्यालयात जाऊन व्याख्यान देता, माझे हात मंत्रालयापर्यंत पोहोचलेले आहेत. अधिवेशनात मी तुमचा मुद्दा उपस्थित करून तुम्हाला नोकरीतून काढू शकतो. 8 जुलै रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मी तुमची चौकशी समिती नेमून मी स्वतःच त्या चौकशी समितीचा अध्यक्ष होणार आहे,’ अशा भाषेत डॉ. सानप यांनी आपणाला धमकावल्याचे डॉ. आनंद वाघ यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.
‘मला त्यांनी बोलण्याची संधी दिली नाही. माझ्याविरोधात आतापर्यंत कोणत्याही महाविद्यालयातील प्राचार्यांची कुलगुरू किंवा त्यंच्या कार्यालयात कसल्याही प्रकारची तक्रार नाही. यानंतर ते कोणालाही माझ्याविरोधात तक्रार देण्यास लावू शकतात,’ अशी भीतीही डॉ. आनंद वाघ यांनी आपल्या राजीनाम्यात व्यक्त केली आहे.
डॉ. सानप यांनी केलेले आरोपही डॉ. आनंद वाघ यांनी फेटाळून लावले आहेत. विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण विभागातील तत्कालीन प्रभारी संचालक डॉ. संजय मून हे प्राचार्यपदावर गेल्यानंतर 25 ऑक्टोबर 2023 रोजी मी विभागाच्या प्रभारी संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. तत्कालीन कुलगुरूंनी त्यावेळच्या प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून महाविद्यालयांना विस्तार युनिट दिलेले होते. त्यामध्ये माझा कुठलाही सहभाग नव्हता, असेही वाघ यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.
आमच्या विभागातील संचालक व शिक्षक हे 2005 पासून महाविद्यालयस्तरावर विद्यार्थी समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमात व्याख्यान देण्यासाठी जातात. मी काही नव्याने जात नाही. त्यातही महाविद्यालयाचे लेखी निमंत्रण असल्याशिवाय कोणत्याही महाविद्यालयात गेलेलो नाही, असेही वाघ यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मी गेल्या 18 वर्षांपासून कार्यरत आहे. मला कोणत्याही अधिकाऱ्याने आतापर्यंत मेमो दिलेला नाही. कारण मी कामात कुचराई केलेली नाही. त्यांच्या या अपमानित बोलण्यामुळे मी प्रभारी संचालक/विभागप्रमुख म्हणून काम करू शकत नाही. म्हणून मी प्रभारी संचालकपदाचा राजीनामा देत आहे, असे डॉ. वाघ यांनी या राजीनाम्यात म्हटले आहे.
मी मराठा असल्यामुळे माझ्याविरोधात षडयंत्र
डॉ. गजानन सानप यांनी माझ्याशी पूर्वग्रह दूषित भावनेने वर्तन केले आहे. मी मराठा असल्यामुळे त्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचले आहे. आजीवन शिक्षण विभागाच्या संचालकपदाची जाहिरात आली आहे. त्या पदासाठी त्यांच्या जवळच्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यापदासाठी अर्ज केलेल्या व मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकलेली आहे. कदाचित लवकरच मुलाखती होतील. माझ्या नियुक्तीत अडचण यावी म्हणून त्यांनी माझी बदनामी सुरू केलेली आहे, असा आरोपही डॉ. वाघ यांनी या राजीनाम्यात केला आहे.
कुलगुरू म्हणाले, तुमचे म्हणणे कुलसचिवांना सांगा
आज मी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची भेट घेऊन त्यांना सगळा प्रकार सांगितला आणि त्यांना राजीनामा दाखवला. त्यांनी मला कुलसचिवांना भेटून तुमचे काय म्हणणे असेल ते सांगा, असे सांगितल्यामुळे मी कुलसचिवांकडे राजीनामा सादर केला. नियमित संचालकपदासाठी मीही अर्ज केला आहे. माझ्याविरोधात चौकशीचे षडयंत्र रचून मला स्पर्धेतून बाहेर करायचे आणि आपल्या जवळच्या व्यक्तीची संचालकपदावर वर्णी लावायची, याचसाठी डॉ. गजानन सानप यांचा हा सगळा आटापिटा सुरू आहे, असे डॉ. आनंद वाघ यांनी न्यूजटाऊनशी बोलताना सांगितले.