मराठवाडा पदवीधर मतदारसंघात ५८.६७ टक्के मतदान, आ. चव्हाण चौकार मारणार की नवा भिडू निवडून येणार?, २७ ऑक्टोबरला फैसला; मतदारांना पैसे कोणी वाटले?, पहा व्हिडीओ


छत्रपती संभाजीनगरः मराठवाडा पदवीधर मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत शुक्रवारी ५८.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. सतीश चव्हाणांसमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतापसिंह पाटलांच्या रुपाने तगडा उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे आ. सतीश चव्हाण यांना यंदाची निवडणूक चांगलीच जड गेली. त्यामुळे सलग तीन टर्म निवडून आलेले आ. चव्हाण विजयाचा चौकार मारणार की तुल्यबळ लढतीत नवा भिडू विधान परिषदेवर निवडून जाणार? याचा फैसला २७ ऑक्टोबरला मतमोजणीच्या दिवशी होणार आहे.

. निवडणूक विभागाकडे प्राप्त झालेल्या तात्पुरत्या (Tentative) आकडेवारीनुसार, विभागातील एकूण ३ लाख २६ हजार ७०० नोंदणीकृत मतदारांपैकी १ लाख ९१ हजार ६८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, ५८.६७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ६२.५३ टक्के मतदान झाले. ही आकडेवारी प्राथमिक स्वरूपाची असून, मतदान केंद्राध्यक्षांच्या दैनंदिनी व मतपत्रिकांच्या हिशेबाची पडताळणी केल्यानंतर अंतिम आकडेवारी निश्चित करण्यात येणार आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आठ जिल्ह्यांचा समावेश असून निवडणुकीसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी एकूण ३ लाख २६ हजार ७०१ मतदारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५८.६८ टक्केच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील ८४२ केंद्रांवर मतदान आज शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान झाले.. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवून मतदान करावयाचे असल्याने मतदारांना योग्य पद्धतीने मतदान करण्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.

 जिल्हानिहाय एकूण मतदार आणि प्रत्यक्ष मतदान

  • छत्रपती संभाजीनगर जिल्हाः एकूण मतदार-९३,३१८, प्रत्यक्ष मतदान-५५.७३ टक्के
  • बीड जिल्हाः एकूण मतदार-५७,६७२, प्रत्यक्ष मतदान-५९.६८ टक्के
  • लातूर जिल्हाः एकूण मतदार-३९,७०३, प्रत्यक्ष मतदान- ५६.४५ टक्के
  • जालना जिल्हाः एकूण मतदार-३३,१९६, प्रत्यक्ष मतदान-५९.८१ टक्के
  • धाराशिव जिल्हाः एकूण मतदार-२९,१४५, प्रत्यक्ष मतदान-६२.५३ टक्के
  • नांदेड जिल्हाः एकूण मतदार-२६,६८७, प्रत्यक्ष मतदान-५९.८१ टक्के
  • परभणी जिल्हाः एकूण मतदार-२६,६६४, प्रत्यक्ष मतदान-६१.८१ टक्के
  • हिंगोली जिल्हाः एकूण मतदार-१०,३१५, प्रत्यक्ष मतदान-६१.५८ टक्के
    मतदानाच्या संख्येनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५२ हजार ७, जालना जिल्ह्यात १९ हजार ८५३, परभणी जिल्ह्यात १६ हजार ४८२, हिंगोली जिल्ह्यात ६ हजार ३५२, नांदेड जिल्ह्यात २१ हजार ९४२, लातूर जिल्ह्यात २२ हजार ४१२, धाराशिव जिल्ह्यात १८ हजार २२५, तर बीड जिल्ह्यात ३४ हजार ४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

दुपारनंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ

सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत २१ हजार २९३ मतदारांनी मतदान केले. सकाळी १० वाजेपर्यंत ६.५२ टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत ६८ हजार ७७ मतदारांनी मतदान केले असून, ही टक्केवारी २०.८४ वर पोहोचली. दुपारी २ वाजेपर्यंत १ लाख १७ हजार ६८६ मतदारांनी मतदान केले व मतदानाची टक्केवारी ३६.०२ झाली. त्यानंतरही मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली.

मतदान केलेल्या १ लाख ९१ हजार ६८९ मतदारांमध्ये १ लाख ५४ हजार ७४८ पुरुष, ३६ हजार ९४० महिला व एका इतर मतदाराचा समावेश आहे. या निवडणुकीत ४१ उमेदवार रिंगणात असून, मतदारांनी मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवून मतदानाचा हक्क बजावला.

संभाजीनगर जिल्ह्याचा कौल ठरणार महत्वाचा

पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक मतदार नोंदणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आहे. त्यामुळे या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोणाच्या बाजूने कौल देतो, यावरच या निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, मतदानाच्या संख्येनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५२ हजार ७, जालना जिल्ह्यात १९ हजार ८५३, परभणी जिल्ह्यात १६ हजार ४८२, हिंगोली जिल्ह्यात ६ हजार ३५२, नांदेड जिल्ह्यात २१ हजार ९४२, लातूर जिल्ह्यात २२ हजार ४१२, धाराशिव जिल्ह्यात १८ हजार २२५, तर बीड जिल्ह्यात ३४ हजार ४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. न्यूजटाऊनच्या प्रतिनिधीने काही मतदान केंद्रांचा फेरफटका मारला असता ही निवडणूक महायुतीला फटका देणारी ठरण्याची शक्यता दिसते आहे.

२७ ऑक्टोबरला फैसला

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा औद्योगिक परिसरात होणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या सुरक्षित ठेवण्याची कार्यवाही निवडणूक प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

पदवीधर मतदारांनाही पैसे वाटले?

यापूर्वीच्या तीनही निवडणुका आ. सतीश चव्हाण यांनी एकतर्फी जिंकल्या होत्या. परंतु शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतापसिंह पाटलांमुळे ही निवडणूक अटीतटीची आणि तुल्यबळ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. दरम्यान, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकींप्रमाणेच याही निवडणुकीत उमेदवारांनी पदवीधर मतदारांना पैसे वाटल्याचे व्हिडीओ समोर आले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी याबाबतचा एक व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. पहा व्हिडीओः

‘हात बघा हात…व्हिडिओ आजचा आहे, जेव्हा महाराष्ट्र राज्याचे शिक्षक आणि पदवीधर आपला लोकप्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया पार पाडत आहेत…’, असे म्हणते दानवे यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओ एक व्यक्ती कोणाला तरी पैसे मोजून देताना दिसत आहे. परंतु हा व्हिडीओ नेमका कुठला आहे?, मतदारांना कोणत्या उमेदवाराने पैसे वाटले? याचा कोणताच तपशील दानवे यांनी दिलेला नाही. परंतु पदवीधर मतदारांनाही पैसे वाटून त्यांची मते विकत घेण्याची वेळ उमेदवारांवर आली आणि पदवीधर मतदारांनीही शे-पाचशे रुपयासाठी स्वतःला निर्लज्जपणे विकले, हेच या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!