Video: भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडून आ. सतीश चव्हाणांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?, बीडच्या प्रचारसभेत म्हणाल्या: ‘घड्याळ दाबून सतीशभाऊंना…’


छत्रपती संभाजीनगरः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचत सलग तीन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे महायुतीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांच्या बीड येथील प्रचारसभेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘घड्याळ दाबून आमच्या सतीशभाऊंना विजयी करा…’ असे आवाहन पदवीधर मतदारांना केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीत पक्ष चिन्हावर नव्हे तर पसंतीक्रमानुसार मतदान करायचे असते, हे मुरब्बी राजकारणी असलेल्या पंकजा मुंडे यांना माहीत असूनही त्यांनी असे आवाहन का केले?, यावरून राजकीय तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-महायुतीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांच्या प्राचारार्थ दोन दिवसांपूर्वी बीड येथील रामकृष्ण लॉन्स येथे जाहीरसभा झाली. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रचारसभेत भाजप नेत्या आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी हे आवाहन केले.

हेही वाचाः शरद पवारांच्या चक्रव्यूहात फसल्यामुळे आ. सतीश चव्हाणांची दमछाक, संस्थात्मक मतदानावरील हुकुमत गमावल्याने यंदाच्या निवडणुकीत विजयाचा चौकार कठीणच!

या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे भाषण संपल्यानंतर बोलायला उभ्या राहिलेल्या पंकजा मुंडे यांनी बॅनरवर आपला फोटो नसल्याबद्दल नाराजीचा सूर लावला. ‘सोशल मीडियावर अवलंबून राजकारण करायचे नसते. सोशल मीडियावर काहीतरी अफवा पसरली की पंकजाताईंचा फोटो नाही. बॅनर व माझा फोटो असेल-नसेल तरी तुमच्या ह्रदयात माझ्याविषयी आदर आहे’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

हेही वाचाः आ. सतीश चव्हाणांनी निवडून यावे ही भाजपची इच्छा की, गमावलेला ‘गड’ रिक्त करून घेण्याचा छुपा अजेंडा?; यंदा अंतर्गत व बाह्य आव्हानांशी ‘सच’ का सामना  अवघडच!

आपले जे काही असते ते रोखठोक असते, हे सांगायलाही पंकजा मुंडे विससरल्या नाहीत. ‘सतीशभाऊंना मी सांगितले की, भाषण करायचे एक आणि बाजूला जाऊन बोलायचे दुसरेच, हे आपल्या संस्कारात बसत नाही. जे आहे ते रोखठोक…’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘मी पंकजा गोपीनाथ मुंडे माझ्यावर प्रेम करणाऱ्या, भारतीय जनता पार्टीवर निष्ठा असणाऱ्या सर्व त्या तरूणांना आवाहन करते की तुम्ही घड्याळ दाबून आमच्या सतीशभाऊ चव्हाण यांना विजयी करा...’ पहा व्हिडीओः

पंकजा मुंडे यांचे हे आवाहन ऐकून मंचावरील उपस्थितांनी एक नंबर मत…पहिल्या पसंतीचे मत…असे सांगून पंकजा मुंडेंची चूक दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. पण पंकजा मुंडेंनी लगेच चूक दुरूस्त केली नाही. ‘आता हे ग्रॅज्युएट आहेत ना?…अन् ते बहादूर आहेत…आरे हे इतके हुशार आहेत…किती क्रॉस करतात…सोसायटीचे मतदान करतात…बँकेचे मतदान करतात…सोसायटीवरचे बादशहा आहेत….बँकेवरचे बादशहा आहेत…’ असे फिरवून सांगत नंतर ‘दोन नंबरला पहिल्या पसंतीचे मत द्यायचे…आणि दोन नंबरला कोण आहे?…सतीश चव्हाण…असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

हेही वाचाः आ. सतीश चव्हाणांच्या लेखी पदवीधरची आमदारकी लोकसेवेचे नव्हे, तर केवळ उत्पन्नाचे साधन?; शपथपत्रातून उघड झाली धक्कादायक माहिती!

पंकजा मुंडे यांनी नंतर सारवासारव केली असली तरी त्या मुरब्बी राजकारणी आहेत. सोसायट्या, सहकारी बँकासारख्या पसंतीक्रमाच्या मतदानावर होणाऱ्या निवडणुकीचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. असे असतानाही त्यांनी घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन का केले? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून त्यांच्या या आवाहनाचे अनेक अर्थ लावले जाऊ लागले आहेत.

या प्रचारसभेला माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, आ. मनोज कायंदे, माजी आमदार भीमराव धोंडे, संजय दौंड, बाळासाहेब आजबे, जयवंतराव जाधव, रमेशराव आडसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप इत्यादी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!