
छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापिसंह पाटील पहिल्या फेरीत ७ हजार ८७८ मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत ७० हजार ५१९ मतांची मोजणी झाली. त्यात डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आ. सतीश चव्हाणांना मागे टाकले.
पहिल्या फेरीच्या मतमोजणीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांना २७ हजार ९९४ मते मिळाली. आ. सतीश चव्हाण यांना २० हजार ११६, रविराज साबळे यांना ७ हजार ४२४ तर दिलीप घुगे यांना ३ हजार १६२ मते मिळाली. अद्याप १ लाख २१ हजार ६८९ मतांची मोजणी बाकी आहे. संपूर्ण मतांची मोजणी पूर्ण होण्यासाठी पहाटेचे चार वाजणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
टपाली मतांत चव्हाण आघाडीडवर
या निवडणुकीत ५१५ टपाली मतदान झाले होते.मंगळवारी दुपारी २ वाजता टपाली मतदानाच्या मोजणीला सुरुवात झाली.सायंकाळी ५ वाजता टपाली मतांची मोजणी पूर्ण झाली.५१५ पैकी ४६९ मते वैध ठरली तर ४६ मते बाद झाली.वैध मतांपैकी आ.सतीश चव्हाण यांना १८७, प्रतापसिंह पाटील यांना १५९, दिलीप घुगे यांना ४० तर रविराज साबळे यांना ३२ मते मिळाली.यावरून टपाली मतपत्रीकेत आ.सतीश चव्हाण २८ मतांना पुढे होते.
पक्ष बदलणाऱ्यांना माफी नाही..चव्हाणांना संदेश
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात मतपत्रिकेत पदवीधरांनी पसंती निहाय मतदान केलेच. शिवाय ज्या उमेदवाराला मत द्यायचं नाही, त्याच्या विरोधात टीकाटिप्पणी करणाऱ्या अनेक चिठ्ठ्या, पत्र देखील मतपत्रिकेसोबत मतपेटीत टाकल्याचे मतमोजणी करतांना समोर आले. कपडे बदलल्याप्रमाणे पक्ष बदलणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही. तीन-तीन टर्म तुम्हाला सत्तेत पाठविले तरी तुम्ही आमच्यासाठी काही केले नाही. आमचा आवाज होण्याचा प्रयत्न देखील तुम्ही केला नाही, असा मजकूर असलेल्या चिठट्या मतपत्रिकेत सापडल्या. काही मतपत्रिकेमध्ये तर शासकीय विभागातील विविध समस्यांच्या व्यथा मांडल्या होत्या, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांच्याही समस्यांकडे पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार वारंवार मागणी करूनही लक्ष देत नसल्याचा आरोप पत्रातून करण्यात आला होता. मतपत्रिकेंसोबत पत्र चिठ्ठ्या सापडल्या की, मोजणी करणारे कर्मचारी त्या चिठ्ठ्या व पत्र वरितांकडे जमा करत होते. पदवीधरांनी मांडलेल्या व्यथांची चर्चा मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधे होती.
प्रतापसिंह पाटील यांना ४३ टक्के मते
७० हजार ५१९ हजारांच्या पहिल्या फेरीत प्रतापसिंह पाटील यांना ४३ टक्के, सतीश चव्हाण यांना ३१ टक्के, रविराज साबळे यांना ११ टक्के, दिलीप घुगे यांना ४.७ टक्के मते मिळाली.तर ८.१ टक्के मते अवैध ठरली.प्रतापसिंह पाटील आणि सतीश चव्हाण यांच्यामध्ये १२ टक्के मतांचा फरक आहे. वैध मते ६४ हजार ८१० तर अवैध मते ५हजार ७०९ आहेत. अंदाजित १लाख ७८ हजार मते वैध ठरण्याची शक्यता आहे.त्यानुसार ९८ हजारांचा कोटा ठरू शकतो. पहिल्या फेरीच्या मतमोजणीनुसार कोटा पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.त्यामुळे कोटा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागतील.सर्वात कमी मते घेणाऱ्या उमेदवारांपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागणार आहे. पहिल्या फेरीत मिळालेली मते अशीः
| उमेदवार | मते |
| दिलीप घुगे | ३१६२ |
| सतीश चव्हाण | २०११६ |
| डॉ. प्रतापसिंह पाटील | २७९९४ |
| कृष्णा पवार | ५४ |
| ॲड.प्रज्ञावंत मोरे | १६० |
| शेख अब्दूल मलीक | १९८ |
| श्रीधर साळवे | १८५ |
| संजीवनी टेकाळे | ४४ |
| इंजि.अकील अहेमद | ३२ |
| अब्दुल खालेद | २२ |
| अविनाश गोरे | २१ |
| प्रा.डॉ.अश्विनकुमार क्षीरसागर | २५ |
| डॉ.अशोक दत्तात्रय कोल्हे | १३५ |
| अशोक दत्ता हेमके | ९ |
| आजम शेख | १०९ |
| इसा यासीन | १४ |
| उगले गजानन रामनाथ | ३० |
| अॅड.अंबादास जाधव | २० |
| कबाडी भागवत मदन | ३९ |
| किशोरकुमार शिंदे | ९ |
| केशव तांदळे | १७७ |
| गंगाधरे लक्ष्मण | १२ |
| घोटे सुशिल सुरेशराव | २७९२ |
| चव्हाण अरुण चिंतामन | ४१ |
| तळेकर विठ्ठल भुजंगराव | ६४० |
| नरसिंह पांडुरंग घोणे | ४७ |
| नामदेव केरबा वाघमोडे | २३ |
| नारायण त्र्यंबक सोन्नी | ११ |
| बालाजी पाटील चाकूरकर | ५६० |
| डॉ.भाऊसाहेब झिरपे | २०० |
| ॲड.भारत फुलारे | २८ |
| मनिषा उर्फ मंदा खरात | १६ |
| ॲड.यशोनिल मोगले | २० |
| सर युसुफ खान हनीफ खान | ४१ |
| रमेश विनायकराव पाटील | २४० |
| रविराज साबळे-पाटील | ७४२४ |
| राजेंद्र शिंदे शिंपाळकर | ४१ |
| डॉ.रोहित बोरकर | ४२ |
| ॲड.विठ्ठल कडवे | १९ |
| विशाल नांदूरकर | ५ |
| ॲड.ज्ञानोबा माने | ५३ |
पहिल्या फेरीत एकूण वैध मतेः ६४ हजार ८१०
अवैध मतेः ५ हजार ७०९
एकूण मतेः ७० हजार ५१९
