‘डॉ. बामु’ अधिसभा निवडणूकः आरक्षित प्रवर्गातील पाचही जागांवर उत्कर्ष पॅनल आघाडीवर, वाचा कुणाला मिळाली किती मते?


औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून या मतमोजणीत महाविकास आघाडी प्रणीत विद्यापीठ उत्कर्ष पॅनल आरक्षित प्रवर्गातील पाचही जागांवर आघाडीवर आहे. आरक्षित प्रवर्गातील या पाचही जागांवर भाजप प्रणीत विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांची चांगलीच पिछेहाट झालेली आहे.

ताज्या माहितीनुसार उत्कर्ष पॅनलचे अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार सुनिल मगरे यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत या प्रवर्गातील ७ हजार मतांची गणती झाली असून त्यापैकी मगरे यांनी ४ हजार ५०० मते घेतली आहेत. दुसऱ्या फेरीत मोजण्यात आलेल्या ८ हजार मतांपैकी मगरे यांनी ५ हजार ५०० मते मिळवली आहेत.

अनुसूचित जमाती प्रवर्गात उत्कर्ष पॅनलचे उमेदवार सुनिल निकम यांनीही आघाडी घेतली असून पहिल्या फेरीत या प्रवर्गातील ५ हजार मतांची गणती पूर्ण झाली असून त्यापैकी निकम यांना  ३ हजार ७५४ मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीत मोजण्यात आलेल्या ७ हजार ६०० मतांपैकी निकम यांना ४ हजार ४०० मते मिळाली आहेत.

इतर मागास प्रवर्गातही उत्कर्ष पॅनलचे उमेदवार सुभाष राऊत आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत या प्रवर्गातील ५ हजार मतांची मोजणी पूर्ण झाली असून राऊत यांना आतापर्यंत ३ हजार ५०० मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीत आतापर्यंत ८ हजार मते मोजण्यात आली आहेत. त्यापैकी निकम यांना ५ हजार ४०० मते मिळाली आहेत.

एनटी प्रवर्गातही उत्कर्षचेच दत्तात्रय भांगे आघाडीवर आहेत. या प्रवर्गातील ३ हजार २१ मतांची मोजणी झाली असून भांगे यांना त्यापैकी १ हजार ७२८ मते मिळाली आहेत. महिला राखीव प्रवर्गातही उत्कर्ष पॅनलच्या पूनम पाटील आघाडीवर आहेत. महिला राखीव प्रवर्गातील ३ हजार मतांची मोजणी पूर्ण झाली असून त्यापैकी पूनम पाटील यांना १ हजार ७०८ मते मिळाली आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!