‘डॉ. बामु’  अधिसभा निवडणूकः खुल्या प्रवर्गातील चार जागांवर उत्कर्ष पॅनलची दमछाक, नरेंद्र काळे विजयी घोषित!


औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतील पदवीधर निर्वाचक गणातील आरक्षित प्रवर्गातील पाचपैकी पाचही जागांवर दणदणीत विजय मिळवणाऱ्या विद्यापीठ उत्कर्ष पॅनलची खुल्या प्रवर्गातील जागांच्या लढतीत मात्र चांगलीच दमछाक होत आहे. खुल्या प्रवर्गातून उत्कर्ष पॅनलचे  नरेंद्र काळे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. मात्र उर्वरित चार जागांवर उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांना निर्धारित कोटा पूर्ण करणेही अवघड जाऊ लागले आहे.

खुल्या प्रवर्गातील विजयासाठी  २ हजार ७४६  कोटा निश्चित करण्यात  आला आहे. आरक्षित प्रवर्गात उत्कर्ष पॅनलचे उमेदवार निर्धारित कोट्यापेक्षा जास्त मते घेऊन विजयी झाले. मात्र खुल्या प्रवर्गातून उत्कर्ष पॅनलचा एकही उमेदवार पहिल्या पसंतीक्रमावर विजयी होऊ शकला नाही. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीवरही या उमेदवारांना विजयाचा कोटा सहजपणे पूर्ण करता आलेला नाही. ताज्या आकडेवारीनुसार  उत्कर्ष पॅनलचे  शेख जहूर खालिद यांना २,७३३ मते, भारत खैरनार यांना खैरनार २,३३६ मते, हरिदास सोमवंशी यांना १ हजार ६० मते,  संभाजी भोसले यांना १ हजार १५९ मते आणि रमेश भुतेकर यांना ९५४ मते मिळाली आहेत. विद्यापीठ विकास मंचच्या योगिता होके पाटील याही काट्याची लढत देत असून त्यांना १ हजार ४७४ मते मिळाली आहेत. तुकाराम सराफ हे उत्कर्ष पॅनलचे उमेदवार ५०६ मते घेऊन अद्याप स्पर्धेत आहेत.

‘दुर्लक्षितां’नाच भरभरून मतदान पणः विशेष म्हणजे या निवडणुकीत विद्यापीठ उत्कर्ष पॅनलच्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना भरभरून मतदान झाले. निर्धारित कोट्यापेक्षांही पहिल्या पसंतीचीच जास्त मते घेऊन हे उमेदवार विजयी झाले. परंतु खुल्या प्रवर्गात स्पर्धा करताना उत्कर्ष पॅनलची दमछाक झाली. खुल्या प्रवर्गातील पाच जागांसाठी पॅनलमध्ये समाविष्ठ केलेले जागांच्या प्रमाणात जास्त उमेदवार हे गणित खुल्या प्रवर्गात उत्कर्ष पॅनलसाठी जास्त दमछाक करणारे ठरले. नरेंद्र काळे यांच्या पत्नी हर्षेमाला नरेंद्र काळे यांना उत्कर्षमधूनच प्रमोट केले जाईल अशी अपेक्षा होती. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख संपल्यानंतर ऐनवेळी शिवसेनेच्या पूनम पाटील यांना उत्कर्ष पॅनलने अधिकृत उमेदवारी दिली आणि हर्षेमाला काळेंचा पत्ता कट झाला तरीही ‘कुठलाही प्रचार न करता’ त्यांना १ हजार २८० मते मिळाली. त्यांचेच पती नरेंद्र काळे यांना मात्र प्रचंड मेहनत करून पहिल्या पसंतीची त्यांच्यापेक्षा दुप्पटीहून थोडी जास्त मिळाली आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांवर ते निवडून आले. उत्कर्षचेच भारत खैरनार यांनाही विजयासाठी दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या निवडणुकीत उत्कर्षच्या नियोजनात गडबड झाल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!