मराठवाड्यात हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे तीव्र धक्के, काही ठिकाणी घरांची पडझड


नांदेडः मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात आज सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या धक्क्यामुळे नागरिकांत घबराट पसरली होती. काही ठिकाणी या भूकंपाच्या धक्क्यांमुळे घरांना तडे गेले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ असल्याचे सांगण्यात आले. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नांदेड शहराच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते.

आज सकाळी नांदेड शहरासह अर्धापूर, भोकर, हदगाव, नायगाव मुखेडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील दांडेगावजवळील रामेश्वर तांडा येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येते. भूकंपाची खोली १० किलोमीटरच्या परिसरात असून या धक्क्यानंतर ३.६ रिश्टर क्षमतेचा पुन्हा दुसरा धक्काही जाणवला. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे ३० सप्टेंबर १९९३ रोजी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतरचा अलीकडच्या काळातील हा मोठा भूकंपाचा धक्का असल्याचे सांगण्यात येते.

हिंगोली जिल्ह्याच्या जवळपास सर्वच ७१० गावांमध्ये आजचा भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी ४.५ रिश्टर स्केलचा धक्का बसला. त्यानंतर काहीवेळातच म्हणजे सकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी ३.६ रिश्टर क्षमतेचा दुसरा धक्का बसला. परभणी जिल्ह्याच्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती तातडीने जिल्हा प्रशासनाला देण्यात यावी, अशा सूचना गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवरही या भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील कुरूंदा व दांडेगावच्या उत्तर भागात असलेल्या रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाची खोली १० किलोमीटर होती.

 या भूकंपाच्या धक्क्यामुळे जमीन चांगलीच हादरली. भूकंपाचा मोठा आवाजही आला. या भूकंपाची तीव्रता हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, वसमत आणि कळमनुरी तालुक्यात अधिक होती. तर सेनगाव आणि हिंगोली तालुक्यात याची तीव्रता कमी होती. आखाडाबाळापूर आणि पिंपळदरी परिसरातही भूकंपाचा मोठा धक्का बसला. या भूकंपामुळे दांडेगाव येथे काही घरांची पडझड झाल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांत औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, काकडदाभा, फुलदाभा, वसमत तालुक्यातील वापटी, कुपटी, पांगरा शिंदे, वाई आणि कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, बोल्डा, पोतरा, नांदापूर या भागात जमीन हादरण्याचे प्रकार वाढले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यामुळे भयभीत होऊन नागरिक घराबाहेर पडले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!