‘सरसकट’ प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी संघटनांना जातीयवादी आणि भ्रष्ट ठरवून सती प्रथेचे उदात्तीकरण करणारे येवले हे पहिलेच कुलगुरू!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): ‘होय मी हुकुमशहा आहे,’ अशी जाहीर कबुली देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी जाता जाता सर्वच प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी संघटनांवर जातीयवादी आणि भ्रष्टाचारी असल्याचे शिक्कामोर्तब केले आणि कायद्याने केव्हाच बंदी घातलेल्या सती प्रथेचे उदात्तीकरणही केले. संविधान निर्मात्याच्या नावाने चालणाऱ्या या विद्यापीठाच्या इतिहासात असा अफलातून ‘प्रमाद’ करणारे येवले हे पहिलेच कुलगुरू ठरले आहे. कुलगुरूंच्या या भूमिकेमुळे आपण जातीयवादी आणि भ्रष्टाचारी नाहीत, हे सिद्ध करण्याची जबाबदारी या सर्वच संघटनांवर येऊन पडली असून त्यांनी तसे न केल्यास त्यांच्याकडेच संशयाने पाहिले जाण्याची दाट शक्यता आहे.

१६ जुलै २०१९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारलेले डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांचा कार्यकाळ येत्या ३१ डिसेंबर रोजी संपत आहे. हा कार्यकाळ संपण्याच्या आठ दिवस आधीच त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा लेखजोखा मांडण्यासाठी आधी स्थानिक पत्रकारांना बोलावून १९ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली आणि नंतर एका मराठी वृत्तवाहिनीला ‘प्रसारित होईल’ अशी मुलाखत दिली.

कुलगुरू येवलेंची पत्रकार परिषद आणि एका मराठी वृत्तवाहनीला दिलेली मुलाखत या दोन्हींमध्ये गैरसोयीचा एकही प्रश्न विचारला गेला नाही. त्यामुळे येवलेंचे कर्तृत्व लख्ख उजळवून टाकण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाल्याचीच चर्चा आता विद्यापीठ वर्तुळात केली जात आहे. न्यूजटाऊनने ही पत्रकार परिषद आणि वृत्तवाहिनीवर मुलाखत प्रसारित होण्याआधीच सहा भागात कुलगुरू येवले यांचे ‘कर्तृत्व’ पुराव्यानिशी उजागर केले आहे. (त्या मालिकेच्या सर्व लिंक या बातमीत दिल्या आहेत.)

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्ह-१: ‘लायकी’ नसतानाही डॉ. प्रमोद येवले कुलगुरू कसे झाले? नागपूरच्या सहसंचालकांच्या फॅक्ट फाइडिंग रिपोर्टमध्ये ‘ना लायकी’चा पर्दाफाश!

एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली. ‘मधली ओळ ४२०’ या सदरात आधी सोशल मीडियावर प्रसारित केली आणि एबीपी माझानेही ही प्रसारित केली. या मुलाखतीत कुलगुरू येवले यांनी विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्राध्यापक संघटना, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना आणि विद्यार्थी संघटना जातीयवादी आणि भ्रष्टाचारी असल्याचे शिक्कामोर्तब करून टाकले. पण जातीयवाद आणि भ्रष्टाचार करणाऱ्या संघटना कोणत्या? असे विचारले असता एकाही संघटनेचे नाव घेतले नाही.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्ह-२: सहायक प्राध्यापकपदासाठीही ‘लायक’ नसलेले डॉ. प्रमोद येवले यांची प्राचार्यपदावरील नियुक्तीच नियमबाह्य, निकष धाब्यावर!

जातीयवाद, दादागिरी आणि भ्रष्टाचार कोण करतेय?

या विद्यापीठात प्रचंड जातीयवाद, दादागिरी, भ्रष्टाचार बोकाळला आहे, असे एबीपी माझाचा प्रतिनिधी विचारतो तेव्हा येवले ‘हो’ अशी मान डोलावतात आणि उत्तर देतात की, ‘जातीचे गट गट जे आहेत त्याचे डॉमिनन्स करण्याचा प्रयत्न होता. स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली तरी हा जातीयवाद आणखी बोकाळत आहे. कमी होण्यापेक्षा, ही एक दुर्दैवी गोष्ट आहे त्याच्यामध्ये. त्या अँगलनी आमच्यासारख्या शिक्षणतज्ज्ञाने विचार केला पाहिजे की या नवीन पिढीला आपल्याला काय द्यायचे आहे?’ असे सांगतानाच येवले यांनी आपल्याला दादागिरीचाही प्रत्यय आल्याचे सांगितले. पण कोणत्या जातीच्या गटाने डॉमिनन्स करण्याचा प्रयत्न केला, हे येवले सांगत नाहीत.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्ह-३: एकही दिवसाची वैद्यकीय रजा न घेताच कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंनी मेडिकल बिलापोटी लाटले ३ लाख ४३ हजार २०६ रुपये!

विद्यार्थी नेत्यांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह

मी कुलगुरू म्हणून रूजू झाल्यानंतर दोन-तीन महिन्यांनी काही होस्टलचे विद्यार्थी माझ्याकडे आले आणि आपण कुलगुरूंना भेटलो तर कोणाच्या लक्षात येईल म्हणून एक संध्याकाळी साडेसहा-सातनंतर आलेत. आणि म्हणाले सर आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. मी म्हटलं काय झालं?  नाही आता या दोन-तीन महिन्यांमध्ये म्हणजे हा माझा इम्पॅक्ट होता तो. दोन-तीन महिन्यांमध्ये आम्हाला कुठल्याही आंदोलनामध्ये बळजबरीने आणल्या गेले नाही, असे येवले यांनी सांगितले. कुलगुरूंचे हे वक्तव्य विद्यापीठ कार्यरत असलेल्या कोणत्याच संघटनांना जनाधार नाही, ते विद्यार्थ्यांना बळजबरीने आंदोलनात आणतात, असे ध्वनित करणारे आणि विद्यार्थ्यी नेत्यांच्या एकूणच क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्ह-४: विद्यापीठाची शैक्षणिक पिछेहाट हाच पाच वर्षे एकमेव ‘अजेंडा’, नॅकचे ‘ए’ मानांकन टिकवणे तर सोडाच ‘बी’ मानांकन मिळणेही अवघड!

सोकॉल्ड संघटना, सोकॉल्ड नेते!

कुलगुरू येवले यांनी विद्यापीठात कार्यरत असलेल्या सर्वच संघटना आणि त्यांच्या नेत्यांना ‘सोकॉल्ड’ म्हणजे कथितठरवले. म्हणजे या संघटनाही नाहीत आणि नेतेही नाहीत, असेच त्यांना सूचित करायचे असावे. ते म्हणाले, जसं आता तिथे काय होतं जे विद्यार्थी शिकतात, त्यांच्या काही फारशा तक्रारी नसतात. मात्र सोकॉल्ड ज्या संघटना, त्यांचे नेते वगैरे असतात यांचा जास्त तिथे उपद्रव वगैरे अशा टाइप असतो…दुर्दैव असे आहे की सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंचा जास्तीत जास्त वेळ हा अशा प्रकारांमध्येच जातो. त्यामुळे जे अकॅडमिक डेव्हलपमेंट आहे, संशोधन आहे ते आमच्यासारख्या सार्वजनिक विद्यापीठांमध्ये कमी पडते असेल हेही आहे त्याच्यामध्ये… असे येवले सांगतात.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्ह-५: कुलगुरू येवलेंकडून १५ लाख ५० हजारांच्या बायोमेट्रिक हजेरी उपकरणांची निविदा न मागवताच खरेदी, नियम धाब्यावर!

 संघटनांकडून विद्यार्थ्यांचे शोषण

 विद्यार्थी तक्रार घेऊन संघटनेकडे गेला की या संघटना त्याला एक्सप्लॉइट म्हणजे शोषण करतात, असा गंभीर आरोपही येवलेंनी केला. ‘तुम्ही म्हणता की जातीय संघटना आहेत?’ या प्रश्नावर येवले म्हणतात…’सामाजिक आहेत, प्राध्यापकांच्या आहेत, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आहेत, अशा अनेक संघटना त्याच्यामध्ये असतात, विद्यार्थ्यांच्याही असतात त्यावेळी मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की एखादा विद्यार्थी- पालक तक्रार घेऊन आला की त्याला लगेच अड्रेस करा. तुम्ही करत नाहीत म्हणून ते संघटनांकडे जातात. संघटना त्याला एक्सप्लॉइट करतात. तुमच्यावरती दबाब आणताहेत आणि दबावामुळे तर तुम्ही काम करताय ना. हे जर तुम्ही इमिजिएट अड्रेस दिलं तर असे होणार नाही, असे येवले म्हणाले.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्ह-६: पाच वर्षे बाबासाहेबांचा तिटकारा आणि प्रतिगामी विचारांना खतपाणी, तरीही ‘या’ बहुजन चाटुकारांनी कुलगुरू येवलेंवर उधळली स्तुतीसुमने!

हेव्यादाव्यासाठी विद्यापीठ वेठीस

मी नेहमी सांगतो..या संघटनांचे किंवा व्यक्तींचे आपसातले हेवेदावे असतात आणि या हेव्यादाव्यासाठी ते विद्यापीठाला वेठीस धरतात… मी यापूर्वी नागपूला काम केलं. अनेक विद्यापीठांशी असोसिएट आहे. पण अशा पद्धतीचे कुठे होत नाही… असे येवले म्हणाले.

होय, मी हुकुमशहा!

 काही जे आरोप आहेत की मी जे सांगतो तेच झाले पाहिजे..यस आय ऍम ए डिक्टेटर…पण विद्यापीठाच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने मी जे काही निर्णय घेतले, ते केले आणि कायद्याच्या चौकटीमध्ये, असे सांगायलाही येवले विसले नाहीत. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताला संसदीय लोकशाही मूल्यांचे संविधान दिले, त्यांच्याच नावाने चालणाऱ्या विद्यापीठाचा कुलगुरू स्वतःला हुकुमशहा असल्याचे अभिमानाने सांगतोच कसा, असा सवाल अनेक जण विचारू लागले आहेत.

कालबाह्य सती प्रथेचे उदात्तीकरण

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीने अंत्यसंस्कारावेळीच त्याच्या चितेवर उडी घेऊन आत्माहुती देण्याची अनिष्ठ ‘सनातन’ प्रथा काही भारतीय समुदायात प्रचलित होती. १८२९ मध्ये ब्रिटिश सरकारने ही प्रथा बेकायदेशीर घोषित करून सती प्रथेवर बंदी घातली आणि तेव्हापासून भारतातून सती प्रथा हद्दपार झाली. परंतु तब्बल १९४ वर्षांनंतरही कुलगुरू येवलेंच्या मनात सती प्रथेचे खूळ घट्ट रूजून बसलेले असल्याची प्रचिती त्यांनी १९ डिसेंबर रोजी विद्यापीठात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आली.

हेही वाचाः कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या ‘कारनाम्यां’ची थेट राज्यपालांकडे तक्रार, गैरकारभाराच्या चौकशीची मागणी!

तुमचा कार्यकाळ संपल्यानंतर प्र-कुलगुरू आणि चार अधिष्ठाता यांचाही कार्यकाळ संपणार का? असा प्रश्न पत्रकारांनी येवलेंना विचारला होता. त्यावर ’३१ डिसेंबर रोजी माझा कार्यकाळ संपतो आहे. कायद्यानुसार चार अधिष्ठाता आणि प्र-कुलगुरू यांनाही माझ्यासोबत सती जावे लागणार आहे. त्यांचाही कार्यकाळ माझ्यासोबत संपणार आहे,’ असे येवले म्हणाले. येवले हे ‘सनातन’ विचार सांगत असताना चारपैकी एक अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे या महिला आहेत, याचे भानही येवलेंना राहिले नाही. त्यांना खुलेआम सती प्रथेचे उदात्तीकरण करण्याचा मोह आवरला नाही. कायद्याने बंदी घातलेल्या एखाद्या प्रथेचे असे जाहीरपणे उदात्तीकरण करणे हा गुन्हा आहे, हेही येवलेंना कळले नसेल का? असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहतो. संत आणि पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या मराठवाड्याच्या भूमीत कालबाह्य सती प्रथेचे उदात्तीकरण करणारे येवले हे पहिलेच कुलगुरू ठरले आहेत.

कोत्तापल्ले आणि चोपडेंच्या काळात काय झाले?

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यापासूनच त्यांच्यात आणि विद्यापीठातील विद्यार्थी संघटना व प्राध्यापक संघटनांत टोकाचा संघर्ष झाला. हा संघर्ष एवढा टोकाला पोहोचला होता की, कोत्तापल्लेंचा कार्यकाळ संपल्यानंतर विद्यापीठात आयोजित केलेला त्यांचा निरोप समारंभही उधळून लावण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे विद्यापीठ परिसराबाहेर कोत्तापल्लेंचा निरोप समारंभ आयोजित करावा लागला. एवढ्या कटू आठवणी असूनही कोत्तापल्लेंनी निरोप समारंभाच्या भाषणात कोणाविषयी चकार शब्दही काढला नाही की कोणाला नाव ठेवले नाही. माझ्या मराठवाड्यात कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली, यापेक्षा माझा मोठा सन्मान नाही, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली होती.

त्यानंतर आलेले कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या काळातही अनेक राडे झाले. त्यांच्यावर अनेक संघटनांनी अनेक आरोप केले. त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंधरा दिवसांपेक्षाही जास्त दिवस उपोषण चालले. परंतु कुलगुरू चोपडे यांनी त्याचा विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. त्यांनी व्यक्तिशः लक्ष घातले म्हणूनच विद्यापीठाला नॅकचे ए मानांकन मिळू शकले. जाता जाता चोपडे यांनीही बाबासाहेबांच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठात काम करण्याची आणि शक्य तितके योगदान देण्याची संधी मिळणे हाच मोठा बहुमान होता, असे सांगत विद्यापीठाचा निरोप घेतला होता. या दोघांनीही कधीच आपली पाठ थोपटून घेतली नाही. या दोन आठवणी येथे मुद्दाम नमूद केल्या पाहिजे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!