सुरेश पाटील/छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)
मूळनियुक्तीपासून ते पुढच्या प्रत्येक नियुक्त्यांत अनियमितता आणि घोळ अशी ‘देदिप्यमान’ आणि ‘असामान्य’ (Extra Ordinary) अध्यापकीय कारकीर्द असलेले डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जागतिक किर्तीच्या विद्वानाच्या नावे चालणाऱ्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड करण्यामागे विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता आणि शैक्षणिक विकास वाढीस लागावी अशी तत्कालीन राज्यपालांची अपेक्षा असावी परंतु डॉ. येवले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रूजू झाल्यानंतरच्या पाच वर्षात विद्यापीठाची प्रचंड शैक्षणिक पिछेहाट झाली. अकॅडमिक ऍक्टिव्हीटीच ठप्प झाल्या परिणामी विद्यापीठाला मिळालेले नॅकचे ‘ए’ मानांकन टिकवून ठेवणे तर सोडाच परंतु ‘बी’ मानांकन मिळवणेही अवघड होऊन बसले आहे.
महाराष्ट्रातील कोणत्याही अकृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवडीचे जे निकष आहेत, त्यात ‘महाराष्ट्र विद्यापीठातील अधिनियमातील तरतुदींनुसार विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व राहणीनामाच्या दर्जात सुधारणा होण्यासाठी राज्य किंवा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीयस्तरावरील विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम राबवण्याचा अनुभव,’ ‘अपेक्षित घटना व समस्यांवर मात करण्याची व त्यासाठी आधीपासून डावपेचात्मक आराखडा तयार करण्याची योग्यता,’ ‘संसाधनांची निर्मिती व त्यांचे न्याय्य वाटप करण्याची योग्यता’ आणि राष्ट्रीय प्राथम्य विचारात घेऊन विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्याची जबाबदारी या निकषांचाही अंतर्भाव होतो.
मराठवाडयासारख्या मागास भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून रूजू झाल्यानंतर डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठाची शैक्षणिक पिछेहाटच करायची असा ‘डावपेचात्मक आराखडा’ आखला होता की काय अशी शंका घ्यावी, इतपत त्यांच्या कामकाजाची पद्धत राहिली आहे.
डॉ. येवले यांच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत अकॅडमिक ऍक्टीव्हीटीजच ठप्प झाल्या. अकॅडमिक ऍक्टीव्हीटीजचा भाग म्हणून विद्यापीठातील विविध विभागांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावरील चर्चासत्रे, सेमिनार, परिषदांचे प्रमाण नगण्य झाले. कोणत्याही नवीन शैक्षणिक विकास प्रकल्पांची आखणी आणि अंमलबजावणी झाली नाही.
विद्यापीठाच्या बहुतांश विभागात एक किंवा दोन प्राध्यापकच कार्यरत असल्यामुळे निर्माण होणारी पोकळी भरून काढण्यासाठी आधी गेस्ट लेक्चरर्स निमंत्रित केले जायचे. त्यामध्येही खोडे घालण्यास सुरूवात झाली.
विशेष म्हणजे विद्यापीठाच्या विभागांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कोणत्याही उपक्रमांच्या खर्चाचे व्हाऊचर्स थेट कुलगुरूच स्वतः तपासू लागले. विभागप्रमुखांना अकॅडमिक ऍक्टीव्हीटीजच्या आयोजनातून समाधान मिळवण्याऐवजी डोकेदुखी वाढली. त्यामुळे त्यांनी ‘नको ही डोकेदुखी’ म्हणून अशा उपक्रमांच्या आयोजनातून अंगच काढून घेतले. परिणामी शैक्षणिक उपक्रम ठप्प झाले.
नको तिथे ‘घणा’चे घाव
एकीकडे अकॅडमिक ऍक्टीव्हीटीजवरील खर्चाला कात्री लावली गेली असताना दुसरीकडे अशैक्षणिक आणि गरज नसलेल्या बाबींवरील खर्चात लक्षणीय वाढ झाली. विद्यापीठ परिसरातील परीक्षा विभागासह अनेक इमारतींच्या चांगल्या फरशा घणाचे घाव घालून तोडून त्या ठिकाणी नव्या फरशा बसवण्यासाख्या बाबींनाच विद्यापीठाचा शैक्षणिक विकास मानण्यास सुरुवात झाली.
‘खंडहर’बाबींवर उधळपट्टी
क्रीडा विभागाच्या शेजारी बांधण्यात आलेल्या आणि वापराअभावी खंडहर झालेल्या डॉर्मेट्री या क्रीडापटूंच्या हंगामी निवासासाठीच्या वसतिगृहाला कुंपण घालण्यावर लाखो रुपये उधळण्यात आले. जी वास्तू वापराअभावी कित्येक वर्षे पडून आहे आणि दारे-खिडक्या तुटून जी वास्तू खंडहर झालेली आहे, त्या वास्तूला कुंपण घालण्यासारख्या फिजूल गोष्टींवर लाखो रुपये कशासाठी उधळले गेले? याचे उत्तर वेगळे सांगण्याची गरज नाही. अशा अनेक अशैक्षणिक बाबींना पाच वर्षांत प्राथम्य मिळाले आणि शैक्षणिक बाबींकडे हेतुतः दुर्लक्ष केले गेले.
प्राथम्य यादीत नेेमके काय?
नवे प्रकल्प तर सोडात पण डॉ. येवले हे कुलगुरूपदी रूजू झाल्यापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राची इमारत तयार होती. गेल्या पाच वर्षांत त्यांना या संशोधन केंद्राचे उद्घाटन करून तेथे संशोधन कार्य सुरू करता आले नाही. त्यामुळे अकॅडमिक लीडरशिपची अपेक्षा असलेल्या कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या प्राथम्याच्या यादीत नेमक्या कोणत्या बाबी होत्या?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शैक्षणिक स्वातंत्र्याचा संकोच
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या आधीचे कुलगुरू डॉ. डॉ. बी.ए. चोपडे आणि त्याआधीचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या कारकीर्दीत जाणीवपूर्क अकॅडमिक ऍक्टीव्हीटीज आणि संशोधनाला प्रोत्साहन दिले गेले. विभागप्रमुख आणि प्राध्यापकांना अकॅडमिक ऍक्टीव्हीटीजचे आयोजन आणि संशोधन प्रकल्पांसाठी मुक्त हस्ते स्वातंत्र्य दिले गेले. त्यामुळेच या दोघांच्या कारकीर्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिरपेचात नॅकच्या ‘ए’ मानांकनाचा तुरा खोवला गेला.
पाच वर्षांत फेरले पाणी…!
काही उपटसुंभांच्या उपद्व्यापामुळे सर्वाधिक बदनाम केले गेलेले कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी तर संशोधन आणि अकॅडमिक ऍक्टीव्हीटीजवर केवळ भरच दिला नाही तर नॅकच्या प्रक्रियेतही व्यक्तिशः घालून ही प्रक्रिया राबवून घेतल्यामुळेच नॅककडून विद्यापीठाला पुनःश्च ‘ए’ मानांकन मिळू शकले.
या दोन्ही कुलगुरूंच्या कारकीर्दीत विद्यापीठाच्या शैक्षणिक वाढीसाठी झालेल्या प्रयत्नांवर नंतरच्या पाच वर्षांच्या काळात पाणी फेरल्या गेले. त्यामुळे पुढच्या वर्षी नॅकला सामोरे जाताना विद्यापीठाचे ‘ए’ मानांकन टिकवून ठेवणे तर सोडाच पण ‘बी’ मानांकन मिळवणेही अवघड जाणार असल्याचे विद्यापीठातील विभागप्रमुख आणि प्राध्यापक खासगीत सांगतात.
कुलगुरूंकडून मिळाली नाहीत १० महिन्यांत या ८ प्रश्नांची उत्तरे
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या कारकीर्दीत विद्यापीठाची शैक्षणिक पिछेहाट होत असल्याची चर्चा विभागप्रमुख आणि प्राध्यापक दबक्या आवाज करू लागल्यामुळे न्यूजटाऊनने थेट कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडूनच याबाबतीतील सत्याअसत्यता पडताळून पाहण्यासाठी दहा महिन्यांपूर्वी म्हणजेच १९ जानेवारी २०२३ रोजी लेखी स्वरुपात ८ प्रश्न पाठवले होते.
कुलगुरूंकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. संजय शिंदे यांच्या मार्फतही हे आठ प्रश्न कुलगुरू डॉ. येवले यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले. परंतु तब्बल दहा महिने उलटून गेले तरी कुलगुरू डॉ. येवले यांनी न्यूजटाऊनच्या या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. ते प्रश्न असेः
- आपल्या कार्यकाळात कोणते शैक्षणिक विकास प्रकल्प राबवले?
- कोणतेही विद्यापीठ ओळखले जाते ते तेथे चालणाऱ्या अकॅडमिक अॅक्टिव्हिटीजमुळे. परंतु गेल्या चार वर्षांत अकॅडमिक अॅक्टिव्हिटी ठप्प झाल्या आहेत… विभागांकडून घेतली जाणारी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रे, परिषदांचे प्रमाण नगण्य आहे…
- डॉ. आंबेडकर रिसर्च सेंटरची इमारत अनेक वर्षांपासून बांधून तयार आहे. पण ते सेंटर सुरू करावे, असे आपणास का वाटले नाही?
- बहुतांश विभागात एकच अध्यापक कार्यरत आहेत, यूजीसीच्या नियमाप्रमाणे किमान एक प्राध्यापक, दोन सहयोगी प्राध्यापक आणि चार सहायक प्राध्यापक असायलाच हवेत. ही पूर्तता करण्याच्या दृष्टीनेही आपल्या कार्यकाळात काही प्रयत्न झालेले दिसत नाहीत.
- एकीकडे प्राध्यापक नाहीत, दुसरीकडे गेस्ट लेक्चर्स आयोजित करण्यातही खोडे घातले जातात. मग विद्यार्थ्यांचे अध्यापन कसे पूर्ण होते? की अध्यापन ही अॅक्टिव्हिटीच विद्यापीठ परिसरातून हद्दपार झाली आहे?
- विद्यापीठाच्या विभागातच किमान निकषांनुसार अध्यापक नाहीत. परंतु संलग्न महाविद्यालयांत अध्यापक नसतील तर त्यांचे संलग्नीकरण रद्द केले जाते. विद्यापीठाला असा नैतिक अधिकार पोहोचतो का?
- अकॅडमिक अॅक्टिव्हिटीच नसतील तर आगामी नॅक मूल्यांकनात आहे ते मानांकन कसे राखता येईल?
- तुम्ही प्रत्येक व्हाऊचर थेट तपासता अशी माहिती आहे.. हे काम तर लेखा विभागाचे आहे…
कुलगुरू डॉ. येवले यांचा कार्यकाळ संपण्यासाठी आता उणेपुरे दोन महिने शिल्लक राहिले आहेत. मावळतीकडे लागलेल्या कारकीर्दीत तरी त्यांनी न्यूजटाऊनच्या या आठ प्रश्नांची उत्तरे दिल्यास त्यांचे स्वागतच केले जाईल. ते धारिष्ट्य कुलगुरू डॉ. येवले दाखवतील का? हा न्यूजटाऊनचा सवाल आहे.