
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या छत्रपती संभाजीनगर येथील पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील १०० कोटी रुपयांच्या कथित अपहाराच्या चौकशीसाठी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. किरण लाढाणे यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असून या समितीला २४ एप्रिलपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या चौकशीमुळे प्राचार्य डॉ. अभिजीत वाडेकर गोत्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात सुमारे १०० कोटी रुपयांचा अपहार करण्यात आल्याची तक्रार सेव्ह पीईएस या चळवळीच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालकांकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक लाढाणे यांनी त्रिसदस्यी चौकशी समिती स्थापन केली आहे.
नांदेडच्या श्री, गुरू गोविंद सिंघजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. एम. बी. कोकरे हे या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष असून याच महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. डी.डी. डोये हे सदस्य आणि नांदेडच्या याच महाविद्यालयातील प्रबंधक डॉ. अरूण पाटील हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव आहे. विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक लाढाणे यांनी १७ एप्रिल रोजी एक आदेश जारी करून ही चौकशी समिती स्थापन केली असून या समितीला आठवडाभरात म्हणजेच २४ एप्रिलपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
सेव्ह पीईएसच्या तक्रारीनुसार, पीईएस संस्थेतील संचालक मंडळातील के.एच. रंगनाथ व मोरे गटाच्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने ४ एप्रिल २०१३ रोजी दिलेल्या आदेशानुसार पीईएस अभियांत्रिकीमहाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणाची तसेच विविध कर अदा करण्याची जबाबदारी तंत्रशिक्षण संचालकांनी छत्रपती संभाजीनगगरच्या विभागीय तंत्रशिक्षण संचालकांकडे सोपवली होती. ही व्यवस्था ऑक्टोबर २०१७ पर्यंत सुरळीतपणे सुरू होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये तत्कालीन संचालक डॉ. अभय वाघ यांनी कार्यभार घेतल्यानंतर ही व्यवस्था शासनाचे अथवा न्यायालयाचे आदेश नसताना गुपचुपपणे बासनात गुंडाळण्यात आली.
तत्कालीन सहसंचालक डॉ. नागदिवे यांना ही बाब देवरे समितीच्या १३ जानेवारी २०२३ च्या अहवालातून कळाली. त्यांनी याप्रकरणी तेव्हाच कारवाई करण्याऐवजी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, पीईएसचे तत्कालीन चेअरमन रंगनाथ यांनी नियुक्त केलेले प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल ब्राम्हणे यांच्या प्रलंबित वेतनाच्या प्रकरणातील प्रक्रियेदरम्यान तंत्रशिक्षण खात्याच्या डिसेंबर २०२५ च्या पत्रातून ही धक्कादायक बाब पुन्हा उघड झाली.
शासनाचे किंवा न्यायालयाचे आदेश नसताना पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर यांनी २०१७ पासून संचालकांना न्यायालयाने दिलेले अधिकार परस्पर वापरले. त्यामुळे ९ वर्षात अंदाजे १०० कोटी रुपयांचा परस्पर व्यवहार होऊन अपहार झाल्याची शक्यता सेव्ह पीईएसने दिलेल्या तक्रारीत व्यक्त केली आहे.
भारताच्या संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेतील नियमबाह्य व बेकायदेशीर व्यवहाराकडे हेतुतः दुर्लक्ष करून त्यात अप्रत्यक्षपणे सहभागी असणारे तत्कालीन संचालक डॉ. अभय वाघ, तत्कालीन सहसंचालक महेश शिवणकर व डॉ. उमेश नागदिवे तसेच विद्यमान अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही सेव्ह पीईएसने राज्य सरकारकडे केली होती. या तक्रारीनंतर या गंभीर प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. ही चौकशी निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणी सेव्ह पीईएसच्या वतीने करण्यात आली आहे.
या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या आजी व माजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. दोषींवर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच राहील असे सेव्ह पीईएसतर्फे कळवण्यात आले आहे. या लढ्यात समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही सेव्ह पीईएसच्या वतीने करण्यात आले आहे.

