आले आर्थिक मंदीचे संकट: जगातील चौथी आणि युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत!


बर्लिनः गेल्या वर्षभरापासून जगभरात आर्थिक मंदी येण्याची चर्चा सुरू असताना आणि अनेक आंतरराष्ट्रीय संस्था व विश्लेषकांकडून मंदीचे इशारे दिले जात असतानाच ही भीती आता खरी होऊ लागली आहे. जगातील चौथ्या क्रमांकाची आणि युरोपीतील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीत आर्थिक मंदीने दार ठोठावले आहे. जर्मनीच्या जीडीपीचे आकडे समोर आले आले असून त्यानुसार जर्मनी मंदीच्या खाईत लोटली गेली आहे. त्यामुळे आर्थिक मंदी ही आता अटकळ किंवा शक्यता राहिली नसून ती वस्तुस्थिती बनली आहे. या आर्थिक मंदीचे जगभरात पडसाद उमटण्याची भीतीही व्यक्त केली जाऊ लागली आहे.

२०२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जर्मनीच्या अर्थव्यवस्थेने नकारात्मक वाढ नोंदवली आहे. सांख्यिकी विभागाने गुरूवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जर्मनीचा जीडीपी ०.३ टक्क्यांनी घसरला आहे. यापूर्वी २०२२ च्या  डिसेंबरच्या चौथ्या तिमाहीत जर्मनीचा जीडीपी ०५ टक्क्यांनी घसरला होता. जेव्हा एखादी अर्थव्यवस्था सलग दोन तिमाहीत नकारात्मक वाढ नोंदवते, तेव्हा ती अर्थव्यवस्था मंदीत असल्याचे मानले जाते.

रशियाकडून केली गेलेली गॅस पुरवठ्याची कपात हे जर्मनीतील आर्थिक मंदीचे सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे जर्मनीत महागाई तर वाढीच पण लोकांची क्रयशक्तीही कमी झाली आहे. त्याचा नकारात्मक परिणाम उद्योगांवर झाला आहे.

यापूर्वी २०२० मध्ये म्हणजेच कोरोना काळातही जर्मनी आर्थिक मंदीच्या संकटात सापडली होती. त्यावेळी लॉकडाऊनमुळे आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या होत्या. परिणामी जर्मनीला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. पण त्यावेळची मंदी आणि आताची मंदी यात खूप मोठा फरक आहे. आता आर्थिक घडामोडी थांबलेल्या नाहीत. तरीही मंदीचे संकट आले आहे.

रशियावरील अवलंबित्व पडले महागात

 जर्मनीची अर्थव्यवस्था मुख्यत्वे निर्यातीवर अवलंबून आहे. जर्मनीतील ५५ टक्के गॅस रशियाला निर्यात केला जातो. परंतु रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे परिस्थिती बदलली आहे. युक्रेन युद्धामुळे पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले. त्याचा निषेध म्हणू रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी जर्मनीकडून केल्या जाणाऱ्या गॅस आयातील मोठी कपात केली आहे. रशियावरील अवलंबित्व आता जर्मनीच्या अर्थव्यस्थेला महागात पडले आहे.

मार्च महिन्यात १२.६ लाख लोक बेरोजगार

जर्मनीतील महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. त्यामुळे घरगुती वस्तूंच्या वापरात १.२ टक्क्यांनी घट झाली आहे. मार्च २०२३ मध्ये जर्मनीतील सुमारे १२.६ लाख लोक बेरोजगार झाले आहेत. तेथील बेरोजगारीचा दर २.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर एप्रिलमध्ये महागाईचा दर ७.२ टक्क्यांवर पोहोचला होता. परिणामी लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे.

उत्पादन क्षेत्र हे जर्मनीची सर्वात मोठी दुसरी ताकद असून या उत्पादन क्षेत्रासमोर गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत. त्याचा स्पष्ट परिणाम जर्मनीच्या अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे.

आर्थिक मंदी म्हणजे काय?

अर्थशास्त्रातील प्रचलित व्याख्येनुसार सलग दोन तिमाहींमध्ये एखादी अर्थव्यवस्था संकुचित झाली तर ती अर्थव्यवस्था आर्थिक मंदीची बळी ठरली असे मानले जाते. जानेवारी ते मार्च २०२३ या तिमाहीतील अर्थव्यवस्थेचा आकुंचन दर गेल्या वर्षीच्या म्हणजेच २०२२ च्या  ऑक्टोबर ते डिसेंबर या शेवटच्या तिमाही पेक्षा कमी असला तरी तो धोकादायक आहे. कारण त्यामुळे जर्मनीची अर्थव्यवस्था आता अधिकृतपणे मंदीच्या खाईत सापडली आहे. जर्मनीतील या आर्थिक मंदीचे जगभरातील अर्थव्यवस्थांवर पडसाद उमटण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!