अंबाजोगाईः बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. महाविद्यालयाच्या सुरक्षकांनी लाठीमार करत हाणामारी करणाऱ्यांना पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती समोर येत आहे.
स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अपघात कक्षात रविवारी रात्री दोन गट आमनेसामने भिडले. रात्री दहा वाजेच्या सुमारास अपघात कक्षात सुरू झालेला हा राडा जवळपास दहा ते पंधरा मिनिटे चालला. या राड्यामुळे अपघात कक्षातील रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक भयभीत झाले होते.
अपघात कक्षातच दोन गटात सुरू असलेली तुंबळ हाणामारी आणि त्यामुळे भयभीत झालेले रूग्ण व त्यांचे नातेवाईक ही परिस्थिती पाहता महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकांनी सौम्य लाठीमार करत हाणामारी करणाऱ्यांना पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दोन गटातील हाणामारीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी पार्किंगवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर दोन गटातील हाणामारीत झाल्याचे सांगण्यात येते. अपघात कक्षात सुरू झालेल्या या तुफान राड्यामुळे कर्मचारी आणि रुग्णांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी सौम्य लाठीमार करून दोन्ही गटाच्या लोकांना पांगवले.
या प्रकरणी स्वीमी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाच्या वतीने अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. या फिर्यादीवरून दोन्ही गटातील १६ जणांविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगाई शहर पोलिस आता या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.