छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद): देवधर्मावर श्रद्धा आणि मुहूर्त पाहूनच कोणत्याही कामाची सुरूवात करण्यासाठी ख्याती असलेले ठाकरे गटाच्या शिवसेनेचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी ‘मुहूर्त’ पाहून मंगळवारी (२२ एप्रिल) शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, परंतु खैरेंच्या या मुहूर्तावरच शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी कोणताही गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भुमरेंनी खैरेंचाच मुहूर्त का साधला? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
शिवेसना ठाकरे गटाने ‘निष्ठावान’ शिवसैनिक चंद्रकांत खैरे यांना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली आहे. खैरे हे प्रचंड धार्मिक आहेत. गंडेदोरे, देवधर्म आणि शुभ-अशुभ यावर त्यांची मोठी श्रद्धा आहे. देवाचे दर्शन घेऊन आणि मुहूर्त पाहूनच ते कोणत्याही कामाची सुरूवात करतात. यासाठी ते प्रसिद्ध तर आहेतच, शिवाय हेच त्यांचे मोठे राजकीय भांडवल देखील आहे.
प्रवृत्तीप्रमाणे चंद्रकांत खैरे यांनी मुहूर्त पाहून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार (२२ एप्रिल) मुकर्रर केला. त्यानुसार त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करून मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्जही दाखल केला. संस्थान गणपतीजवळ त्यांनी आपल्या रॅलीचा समारोप केला. यावेळी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते.
चंद्रकांत खैरे यांनी मुहूर्तानुसार उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या काही वेळानंतरच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी कुठलाही गाजावाजा न करता आणि कुठलेही नियोजन नसताना अचानक जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपला डमी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंदे गटाच्या उमेदवाराने ठाकरे गटाच्या उमेदवाराचा मुहूर्त का साधला? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे यांना शिंदे सेनेकडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु भुमरे यांची उमेदवारी कायम राहील की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात असतानाच मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सोमवारी नागपूर येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
उमेदवारीसाठी ते एकनाथ शिंदे यांच्याही संपर्कात आहेत. ही बाब कळताच संदीपान भुमरे यांनी कुठलाही गाजावाजा न करता तातडीने जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपला डमी उमेदवारी अर्ज दाखल केला. विनोद पाटील यांच्यामुळे आपला पत्ता कट केला जाऊ शकतो, अशी भीती कदाचित संदीपान भुमरे यांना वाटली असावी, अशी चर्चा आहे.
संदीपान भुमरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत २५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते आ. संजय शिरसाठ यांनी जाहीर केले होते. त्या दृष्टीने शिंदे सेनेने तयारीही सुरू केली होती. मात्र भुमरे यांनी सोमवारी दुपारी कुठलाही गाजावाजा न करता खैरेंचाच ‘मुहूर्त’ साधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.