ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी सोमवारऐवजी बुधवारी, अनंत चतुर्दशीमुळे बदलली तारीख!


मुंबई: अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण मंगळवारी (१७ सप्टेंबर) रोजी असल्यामुळे मुस्लिमांच्या ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी सोमवारऐवजी (१६ सप्टेंबर) बुधवारी (१८ सप्टेंबर) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची शासकीय अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवारी (१६ सप्टेंबर) दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

मंगळवारी (१७ सप्टेंबर) रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवारी (१८ सप्टेंबर) जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात सोमवारी (१६ सप्टेंबर) घोषित केलेली ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवारी (१८ सप्टेंबर) दिवशी जाहीर करण्यात असल्याची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केली आहे.

हेही वाचाः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ईदची सार्वजनिक सुट्टी सोमवारीच, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर संबंधित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीची तारीख विचारात घेऊन सोमवारी (१६ सप्टेंबर) जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवारी (१८ सप्टेंबर) सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे सामान्य प्रशासन विभागाने कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!