भाजपच्या राजकीय कार्यक्रमासाठी एनएसएसचे ५०० ‘स्वयंसेवक’, विद्यापीठ प्रशासनाच्या ‘संघदक्ष’ निर्णयावर विविध संघटनांचा आक्षेप


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजकीय कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) ५०० स्वयंसेवक तैनात करण्याच्या निर्णयावर विविध संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या नेतृत्वातील विद्यापीठ प्रशासन विशिष्ट विचारसणीला म्हणजेच भाजप आणि आरएसएसला खतपाणी घालत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.

भाजपच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शाखेच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्रसेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाअंतर्गत १३ ऑगस्ट रोजी रेल्वे स्टेशन परिसरातील अयोध्या नगरी मैदानावर महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. भाजपचे राजेंद्र साबळे हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. भाजपचे ‘कमळ’ चिन्ह लावून या कार्यक्रमाचे सध्या जोरदार मार्केटिंग सुरू आहे.

या महाआरोग्य शिबिराच्या व्यवस्थापनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेत काम करणारे ५०० स्वयंसेवक तैनात करण्याचे फर्मान जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी ८ ऑगस्ट रोजी विदयापीठ प्रशासनाला सोडले.

देवेंद्रसेवा सप्ताह हा काही राज्य सरकारने आयोजित केलेला शासकीय कार्यक्रम नाही तर भाजपने आयोजित केलेला हा राजकीय कार्यक्रम आहे, याचे भान जसे जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवले नाही, तसेच विद्यापीठ प्रशासनानेही ठेवले नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान प्राप्त होताच राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालक डॉ. सोनाली क्षीरसागर यांनी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहून रासेयोच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांना १० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पूर्वतयारी बैठकीसाठी रासेयोच्या स्वयंसेवकांची यादी घेऊन हजर राहण्याचे फर्मान सोडले.

 विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या विविध संघटनांच्या नेत्यांनी शुक्रवारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेऊन तीव्र आक्षेप घेतला. अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड आणि रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने राजकीय कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे मनुष्यबळ वापरण्याला विरोध केला.

गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठ प्रशासन विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्ती आणि संस्थांना छुप्या पद्धतीने मदत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजप आणि आरएसएस प्रणित कार्यक्रमासाठी एनएसएसचे स्वयंसेवक पाठवण्याचा निर्णय तत्काळ रद्द करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. या विरोधानंतर विद्यापीठ प्रशासनाने अपर जिल्हाधिकारी लोखंडे यांना पत्र लिहून विरोध करणारी निवेदने पाठवली आणि मार्गदर्शन मागवले. एरवी मी राज्यपालांनी नियुक्त केलेला कुलगुरू असल्यामुळे आपला दुसरा कोणीच ‘बॉस’ नाही, अशी भूमिका घेणारे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी मला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश टाळता येणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वीही विद्यापीठ प्रशासनाने भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेसाठी एनएसएसचे स्वयंसेवक पाठवण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थी संघटनांनी त्या निर्णयाला आक्षेप घेताच विद्यापीठ प्रशासनाने तो निर्णय मागे घेतला होता. आरएसएस आणि भाजपच्या राजकीय फायद्यासाठी विद्यापीठाची यंत्रणा आणि मनुष्यबळाचा वापर करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागले आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे चालणाऱ्या विद्यापीठाचे संघीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप या संघटनांकडून केला जात आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *