नांदेडः नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील मनुतांडा येथे २ ऑगस्ट रोजी शामका अण्णाराव राठोड या १६ वर्षीय मुलीचा झालेला मृत्यू हा आत्महत्या नसून वडिलांनीच स्वतःच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी केलेले ‘ऑनर किलिंग’ असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मुलीच्या खुनाच्या या प्रकरणात तिची आईच फिर्यादी झाली आणि जन्मदात्या बापाला मुक्रमाबाद पोलिसांनी गुरूवारी बेड्या ठोकल्या आहेत.
मनुतांडा येथील शामका अण्णाराव राठोड या अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. मुलीने आत्महत्या केल्याची माहिती आई-वडिलांनी ग्रामस्थांना दिली होती. शामका ही मानकिस दबावाखाली असल्यामुळे आजारपणाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची बतावणी शामकाच्या आई-वडिलांकडून करण्यात आली होती.
शामकाचा मृतदेह आढळून आल्यानंतर अवघ्या दोन तासांत आईवडिलांनी घाईघाईत तिच्यावर अंत्यसंस्कार उरकले होते. त्यानंतर शामकाच्या ‘ऑनर किलिंग’ची चर्चा पंचक्रोशीत सुरू झाली होती. अप्पर पोलिस अधीक्षक अभिनाशकुमार यांनी मनुतांड्याला भेट दिली.
ऑनर किलिंग चर्चा पुढे आल्यानंतर मुक्रमाबाद पोलिसांनी मनुतांडा गाठला. तेव्हा शामकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी शामकाचा मृतदेह जाळलेल्या ठिकाणाहून हाडे आणि राखेचे नमुने घेतले होते. किमान दोन डझनापेक्षा जास्त लोकांचे बयान नोंदवूनही या प्रकरणाबाबत कुणीही काहीच बोलायला तयार नव्हते.
पोलिसांनी शामकाचे वडिल अण्णाराव यांच्या दोन भावांचे बयान घेतले. त्यानंतर शामकाची आई पंचफुलाबाई हिला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेऊन विश्वासात घेतले असता तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि घडलेला थरारक घटनाक्रम पोलिसांना सांगितला.
शामकाचे राजुरा तांडा येथील तिच्या आत्याचा मुलगा तुषार चव्हाण याच्याशी प्रेमसंबंध होते. तुषारशीच लग्न करण्याचा हट्ट शामकाने धरला होता. परंतु तुषार नशा करत असल्यामुळे शामकाच्या आईवडिलांनी त्याच्यासोबत लग्न लावून देण्यास नकार दिला. शामकाला त्यांनी वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु शामका काही तुषारच्या प्रेमातून बाहेर पडायला तयार नव्हती.
वारंवार सांगूनही शामका ऐकत नसल्याचा राग मनात ठेवून तिचे वडिल अण्णाराव यांनी २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरातच तिच्या मानेवर कोयत्याने वार करत तिची निर्घृण हत्या केली
शामकाची हत्या केल्यानंतर अण्णारावने पुरावे नष्ट करण्यासाठी लगेचच तिचा मृतदेह शेतात जाळला. घरातील रक्ताचे डाग पाण्याने पुसले. तिचे रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकले. हत्येसाठी वापरलेला कोयता ऊसाच्या शेतात फेकून दिला. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुलाही मारून टाकेन, अशी धमकी अण्णारावने पत्नी पंचफुलाबाईला दिली. त्यानंतर शामकाने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.
पोलिसांना पंचफुलाबाईने हा प्रकार सांगितल्यानंतर तिच्याकडून रितसर फिर्याद लिहून घेण्यात आली आणि भादंविच्या ३०२, २०१, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून अण्णाराव याला अटक करण्यात आली.