छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): अखिल भारतीय स्वतंत्र अनुसूचित जाती संघाच्या (आईस्का) वतीने येत्या रविवारी (१७ मार्च) छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) दलित अजेंडा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत आंबेडकरी अभ्यासक आणि तळागाळातील आंबेडकरी कार्यकर्ते दलित अजेंड्यावर विचारमंथन करणार आहेत.
समानतेवर आधारित सशक्त भविष्य निर्मितीसाठी आईस्काच्या वतीने दलित अजेंडा परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दलित अजेंडा परिषदेनंतर येत्या रविवारी छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) दलित अजेंडा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील आंबेडकरवादी नेते आणि अभ्यासकांच्या विचारमंथनातून व्यापक आणि सर्वंकष दलित अजेंडा निश्चित करण्याचा या परिषदेचा हेतू आहे.
रविवारी खोकडपुऱ्यातील शासकीय दूध डेअरी शेजारील मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात सकाळी साडेदहा ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही दलित अजेंडा परिषद होणार आहे. दोन सत्रात होणाऱ्या या परिषदेच्या पहिल्या सत्रात सकाळी ११ ते दुपारी दीड या वेळेत आंबेडकरी अभ्यासक दलित अजेंडाबाबतचा दृष्टिकोन मांडणार आहेत. त्यात मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. एम.ए. वाहुळ, निवृत्त प्राध्यापक डॉ. स्नेहलता मानकर, जालन्याच्या मत्स्योदरी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. डी.एस. गजहंस, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक सतीश बनसोडे आणि आईस्काचे अध्यक्ष डॉ. राहुल सोनपिंपळे सहभागी होणार आहेत. आईस्काच्या केंद्रीय समितीचे सदस्य डॉ. सचिन बनसोडे हे परिषदेच्या आयोजनामागची भूमिका मांडणार आहेत.
परिषदेच्या दुसऱ्या सत्रात दुपारी अडीच ते सायंकाळी पाच यावेळात तळगाळातील आंबेडकरी कार्यकर्ते दलित अजेंडाबाबतचा दृष्टिकोन मांडणार आहेत. त्यात ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील, आंबेडकरी कार्यकर्ते अजिंक्य चांदणे, अधिवक्ता सिद्धार्थ शिंदे, आंबेडकरी कार्यकर्ते सिद्धार्थ शिनगारे आणि आईस्काच्या राज्य सचिव दिपाली साळवे सहभागी होणार आहेत.
अनुसूचित जातीच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आव्हानांचा समावेश असलेल्या व्यापक दलित अजेंडावर चर्चा करण्यासाठी मोठ्या संख्येने या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन आईस्काच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.