विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात प्रा. अशोक बंडगर दोषी, आता होणार विभागीय चौकशी!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अशोक बंडगर याला महिलांविषयीच्या अंतर्गत तक्रार समितीने दोषी ठरवले असून आता बंडगरची निवृत्त न्यायाधीशामार्फत विभागीय चौकशी होणार आहे. महिनाभरात ही चौकशी पूर्ण करून बंडगरवर पुढील कारवाई केली जाणार आहे.

अशोक बंडगरने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नाट्यशास्त्र विभागातीलच एका विद्यार्थिनीने महिलांविषयीच्या अंतर्गत तक्रार समितीकडे केली होती. या समितीने आपला चौकशी अहवाल नुकताच कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालात समितीने अशोक बंडगरला दोषी ठरवल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

विद्यापीठाच्य अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार केल्यानंतर पीडित विद्यार्थिनीने बंडगरच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिसांनी २५ एप्रिल रोजी अशोक बंडगरसह त्याच्या पत्नीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल होताच अशोक बंडगर फरार झाला. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने त्याला २६ एप्रिल रोजी निलंबित केले.

विद्यापीठातील महिलांविषयीच्या अतंर्गत तक्रार समितीच्या पीठासन अधिकारी प्रा. अंजली राजभोज यांच्यासह समितीच्या अन्य सदस्यांनी या प्रकरणाची इन कॅमेरा सुनावणी घेतली. वारंवार चौकशी समितीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावूनही अशोक बंडगर चौकशीला प्रत्यक्ष सामोरे गेलाच नाही.

अटकेच्या भीतीमुळे फरार असलेल्या अशोक बंडगरने समितीकडे ऑनलाइन खुलासा पाठवला. परंतु नियमानुसार चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहणे बंधनकारक असल्यामुळे त्याचा ऑनलाइन खुलासा रेकॉर्डवर घेण्यात आला नाही.

अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर अशोक बंडगरने अंतर्गत तक्रार समितीकडे हजर राहून आपली सुनावणी घ्यावी यासाठी खटाटोप केला खरा, परंतु तोपर्यंत समितीचे कामकाज पूर्ण झाले होते आणि वेळ निघून गेली होती.

अंतर्गत तक्रार समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी अशोक बंडगरला नोटीस पाठवून खुलासा मागवला होता. त्याचा खुलासा समाधानकारक नसल्यामुळे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी अशोक बंडगरची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता सेवानिवृत्त न्यायमूर्तीकडून अशोक बंडगरची विभागीय चौकशी केली जाणार आहे. विभागीय चौकशीची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करावयाची असते. परंतु या प्रकरणात महिनाभरात चौकशी पूर्ण करण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा मानस आहे. ही विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर महिनाभरानंतर अशोक बंडगरच्या बाबतीत पुढील निर्णय घेतला जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!