‘तू तुझ्या औकातीत राहा…..’ म्हणत खा. ओमराजे निंबाळकर- आ. राणा पाटलांना भिडले, जिल्हाधिकाऱ्यांसमोरच हमरीतुमरी!

उस्मानाबादः   उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर आणि तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पीकविम्याबाबतच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. पीकविम्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात हमरी-तुमरी झाली. अरे-तुरेच्या भाषेचा वापरही झाला आणि एकमेकांची औकात काढण्यापर्यंत हे प्रकरण गेले. ‘तू तुझ्या औकातीत राहा. तुझी आणि तुझ्या खानदानाची औकात सगळ्यांना माहीत आहे,’ अशा शब्दांत खा. ओमराजेंनी राणा जगजितसिंह पाटलांना सुनावले. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज, शनिवारी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची पीकविम्याच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होती. या बैठकीला नंतर शिवसेना खासदार ओमप्रकाश निंबाळकरही पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यास सुरूवात केली आणि या बैठकीला लोकप्रतिनिधींना का बोलावण्यात आले नाही, असा सवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला.

ओमराजेंचे हे बोलणे ऐकून ओमराजेंना उद्देशून ‘बाळा लोकप्रतिनिधी नसतो रे’ असे राणा जगजितसिंह पाटील म्हणाले. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांचा पारा चढला. ‘तू नीट बोल, बाळ म्हणू नकोस. तुझ्या औकातीत राहा, तू आणि तुझ्या खानदानाची औकात आणि संस्कार सर्वांनाच माहीत आहे. तू नीट बोल’ अशा शब्दांत ओमराजेंनी राणा जगजितसिंह पाटील यांना सुनावले. ओमराजेंना प्रत्युत्तर म्हणून ‘बाळच आहेस तू’ असा टोमणा राणा जगजितसिंह यांनी मारला आणि वातावरण आणखीच तापले.

राणा जगजितसिंह पाटील यांच्या या टोमण्याने संतापलेल्या ओमराजेंनी पुन्हा ‘तुमचे संस्कार, तुमची औकात सगळे माहीत आहे. तुला बोललेलो नाही. मला तुला बोलायचे कारणही नाही’ असा एकेरी उल्लेख करत सुनावले. या दोन लोकप्रतिनिधींमध्ये सुरू असलेली ही हमरीतुमरी पाहून जिल्हाधिकारी सचिन ओमबासेही चक्रावले. त्यांनी दोन्ही लोकप्रतिनिधींना शांत करण्याचा प्रयत्न केला.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणात निंबाळकर-पाटील हा जुनाच वाद आहे. पवनराजे निंबाळकर हत्याकांडानंतर तर या वादाला आणखीच टोकदार धार चढली आहे. त्यामुळे हे दोन्ही लोकप्रतिनिधी जेव्हा जेव्हा आमने-सामने येतात, तेव्हा तेव्हा राजकीय तणाव निर्माण झालेला पहायला मिळतो. आज बऱ्याच वर्षांनंतर ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील हे आमने-सामने आले आणि त्या वादाची धग अजूनही कायम असल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *