नाशिकः ‘गद्दार’ म्हटल्यावर मला कोणी शिव्या देत असेल तर तो माझा सन्मान समजतो. कारण ते ‘गद्दार’ आहेत. त्यांना आई-बहिणीवरून उत्तम शिव्या देता येत असतील तर त्यांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे भाजपचे राज्यपाल, प्रवक्ते आणि मंत्र्यांना द्याव्यात. आम्ही शिव्या देणाऱ्यांवर फुले उधळू, असे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
चित्रपटामध्ये जसे अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असे कोरले होते, तसेच शिंदे गटाच्या आमदारांच्या कपाळावर ‘गद्दार’ कोरले आहे. याचा त्रास त्यांना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत होईल, अशी टीका खा. राऊत यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर केली होती. राऊतांच्या या टिकेला उत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली होती आणि त्यांनी राऊतांना शिव्या घातल्या होत्या. त्यावर राऊतांनी आज प्रतिक्रिया दिली.
‘गद्दार’ म्हटल्यावर कोणी मला शिव्या देत असेल तर तो मी माझा सन्मान समजतो. कारण ते ‘गद्दार’ आहेत. त्यांना आईबहिणीवरून उत्तम शिव्या देता येत असतील तर त्यांनी सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणारे भाजपचे राज्यपाल, प्रवक्ते आणि मंत्री यांना द्याव्यात. आम्ही शिव्या देणाऱ्यांवर फुले उधळू, महाराष्ट्रही तुमचे कौतुक करेल, असे राऊत म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करताय. सावित्रीबाई फुलेंचा अपमान सहन करताय. हे शिवप्रेमाचे ढोंगच आहे, त्याची लाट आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना रावण म्हटल्यावर तुमची अस्मिता जाही होते. महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान केल्यावर तुमची अस्मिता थंड पडते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रत्येक भावनेबद्दल आम्ही सहमत आहोत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत, असेही राऊत म्हणाले. संजय राऊत हे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत.