समृद्धी महामार्गावर फिल्मी स्टाईलमध्ये हवेत गोळीबार, फुलंब्री पोलिसांत तरूणाविरुद्ध गुन्हा


औरंगाबादः नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ कार उभी करून फिल्मी स्टाईलमध्ये गोळीबार करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर गोळीबार करणाऱ्या युवकाविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या युवकाचा शोध घेत आहेत.

समृद्धी महामार्गावर सावंगी बोगद्याजवळ १४ डिसेंबर रोजी हा फिल्मी स्टाईल थरार करून त्याचा व्हिडीओ करण्यात आला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. बाळू गायकवाड असे हवेत गोळीबार करणाऱ्या युवकाचे नाव आहे. सावंगी बोगद्यासमोर  एमएच २०- एफजी २०२० क्रमांकाची स्कॉर्पिओ उभी करण्यात आली. या स्कॉर्पिओच्या मागून गॉगल घातलेला, गळ्यात चेन, पायात स्पोर्ट्स शूज, मनगटावर दोरे आणि हातात घड्याळ असलेला काळे टी शर्ट घातलेला एक तरूण स्टाईलमध्ये हातात बंदूक घेऊन या स्कॉर्पिओसमोर येतो आणि आकाशाकडे पहात हवेत गोळीबार करतो, असे या व्हिडीओत दिसत आहे.

या फिल्मी स्टाईल गोळीबाराचा व्हिडीओ शूट करून त्यानेच इंस्टाग्रामवर अपलोड केला. तो तुफान व्हायरलझाल्यानंतर फुलंब्री पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र निकाळजे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि व्हिडीओची खात्री केली. त्यानंतर बाळू गायकवाड विरोधात पोलिस अंमलदार अनंता पाचंगे यांच्या फिर्यादीवरून शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा इशाराः अशा प्रकारे स्टंटबाजी करून आणिधोकादायक शस्त्रांसह फोटो काढून समाजात दहशत पसरविणाऱ्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे. युवकांनी अशा प्रकारची स्टंटबाजी करू नये. प्राणघातक शस्त्रांसह सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवणारी कृत्ये करून त्याचे व्हिडीओ, फोटो, सोशल मिडियावर व्हायरल करणाऱ्या इसमावर सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा यांची विशेष नजर असून अशा व्यक्तींला सक्त व कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!