भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया १५ जूनपासून सुरू होणार


मुंबई: भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे राबवण्यात येत आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन अर्ज व नुतनीकरणाचे १५ जूनपासून ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महाडीबीटी प्रणालीवर नवीन तसेच नुतनीकरण अर्जांसाठी ऑनलाईन स्वीकृती प्रक्रिया २५ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील नुतनीकरण अर्ज तसेच २०२४-२५ मधील नवीन अर्ज सादर करण्यासाठी ३१ मे २०२५ पर्यंत अंतिम मुदत आहे. त्यानुसार शिष्यवृत्तीसाठी नवीन व नुतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे १५ जूनपासून ऑनलाईन स्वीकारण्यात येतील.

सर्व महाविद्यालयांनी आपापल्या स्तरावर प्राप्त झालेल्या अर्जांची प्रथम प्राधान्याने पडताळणी करून ते ऑनलाईन पद्धतीने मंजूर करावेत. त्यानंतर संबंधित अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांच्या लॉगिनवर तत्काळ पाठवावेत.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रम इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वीसाठीचे (सर्व शाखा, एमसीव्हीसी, आयटीआय इत्यादी) नवीन अर्ज व नुतनीकरणाचे प्राप्त अर्ज १५ जून ते १५ ऑगस्ट २०२५ या मुदतीत महाविद्यालयांनी ऑनलाईन अग्रेषित करावेत.

वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम, द्वितीय व तृतीय सर्व शाखा कला, वाणिज्य, विज्ञान आदींसाठी नवीन व नुतनीकरणाचे अर्ज १५ जून ते १० सप्टेंबर २०२५ पर्यंत महाविद्यालयांनी ऑनलाईन अग्रेषित करावेत.

वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम (प्रथम, द्वितीय, तृतीय अंतिम वर्ष (सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन अभ्यासक्रम, फार्मसी व नर्सिंग अभ्यासक्रम) आदींचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज महाविद्यालयांनी १५ जून ते १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अग्रेषित करावेत.

 भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजनेच्या लाभापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी घ्यावी, असे आवाहन मुंबई शहरच्या सहायक समाज कल्याण आयुक्त सुनिता मते यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!