मुंबईकरांसाठी मोठी बातमीः पश्चिम रेल्वेवर ३६ तासांचा पॉवर ब्लॉक, आज आणि उद्या लोकलच्या १६२ फेऱ्या रद्द


मुंबईः पश्चिम रेल्वेवरील कांदीवली आणि बोरीवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ३६ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे आज आणि उद्या लोकलने प्रवास करताना वेळापत्रक कटाक्षाने पाळावे लागणार आहे.

कांदीवली- बोरीवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी पाचव्या आणि यार्ड मार्गिकेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी कांदीवली पश्चिम लगतचे उन्नत तिकिट आरक्षण केंद्र पाडण्यात येणार आहे. त्यामुळे सात खिडक्यांचे पर्यायी नवे केंद्र खुले करण्यात आले आहे.

आज शनिवारी (३१ मे) दुपारी १ वाजेपासून ते उद्या रविवारी (१ जून) मध्यरात्री १ वाजेपर्यंत हा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. त्यामुळे शनिवारी दुपारनंतर लोकलच्या ७३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तर रविवारी लोकलच्या ८९ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या लोकल फेऱ्यांची संख्या १६२ आहे. विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉकच्या कालावधीत काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेनेही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स (सीएसएमटी) ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक घोषित केला आहे. मेगा ब्लॉकच्या या वेळेत रेल्वे रूळांबरोबरच सिग्नलच्या देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या सएमएमटी ते विद्याविहार मार्गावर रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंतच्या वेळेत अप-डाऊन धीम्या लोकल अप-डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. घाटकोपरवरून या लोकल पुन्हा अप-डाऊन धीम्या मार्गावर धावतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होतील तर काही लोकल २० मिनिटे विलंबाने धावतील.

हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर रविवारी सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंतच्या वेळेत सीएसएमटी/वडाळा ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या अपड-डाऊन लोकल रद्द राहणार आहेत. हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना पनवेल ते कुल्यावरून (फलाट क्रमांक ८) विशेष फेऱ्या चालवण्यात येतील.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!