हरिद्वारः एकीकडे २२ जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे राजकीय भांडवल करून पुरेपुर लाभ उचलण्याची तयारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (आरएसएस) केली जात असतानाच या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चारही पीठांचे शंकराचार्य गैरहजर राहणार असल्याची माहिती उत्तराखंडच्या ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी गुरूवारी दिली. विधिवत पूजा न केल्यास मूर्तीमध्ये भूत-पिशाच्चांचा प्रवेश होतो, असा दावाही त्यांनी केला आहे.
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामध्ये सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे बहुतांश प्रमुख हिंदू धर्मगुरू या कार्यक्रमाला गैरहजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राम मंदिराची उभारणी पूर्ण होण्याआधीच श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे हिंदू धर्माच्या नियमाविरोधात आहे. अशा पद्धतीने घाई करण्याची आवश्यकता नव्हती, असेही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.
पुरीच्या गोवर्धन पीठाचे शंकाचार्य निश्चलानंद सरस्वती यांनीही आपण मोदी विरोधी नसल्याचे स्पष्ट करतानाच धर्मशास्त्राविरुद्ध जाऊ शकत नाही, असे म्हटले आहे.
सर्वकाही धर्मग्रंथातील पद्धतीप्रमाणे झाले पाहिजे. धर्मग्रंथानुसार प्राणप्रतिष्ठा आणि भक्ती झाली नाही तर मूर्तीमध्ये सैतानी शक्तींचा प्रवेश होतो आणि सर्वत्र गोंधळ माजतो, असेही निश्चलानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
तिथे उभा राहून फक्त टाळ्या वाजवू का?
हा सोहळा सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करून तिथे देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे आहे. मोदी मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील. मग मी तिथे उपस्थित राहून काय करू? तिथे फक्त राहून टाळ्या वाजवू का? असेही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.
राम मंदिर कोणाचे?
हिंदू धर्मग्रंथानुसार अयोध्येतील राम मंदिरात पूजन होत नसल्याच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त चंपत राय यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अयोध्येतील राम मंदिर हे रामानंद संप्रदायाचे आहे. शैव, शाक्य आणि संन्याशांचे नाही. रामानंद पंथाने केवळ विष्णू अवतार असलेल्या रामाच्या परंपरेचे पालन केले आहे, असे चंपत राय यांनी म्हटले आहे.