
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान व सचिव आस्मा खान यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून एम. ए. हिंदी पाठ्यक्रमाच्या प्रथम सत्राचे सर्वच्या सर्व पेपर बेकायदेशीरपणे सोडवून घेतल्याप्रकरणी यशंवतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने चौकशी समिती स्थापन केली खरी, परंतु तब्बल चार महिने उलटले तरी चौकशीचे हे गुऱ्हाळ काही संपले नाही. परिणामी या ‘चारसौ बीसी’ला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे मुक्त विद्यापीठाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
खुलताबादच्या कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र आहे. स्वतःच्याच महाविद्यालयातील या अभ्यास केंद्रावर कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान आणि सचिव आस्मा मझहर खान (समीना बानो) यांनी एम. ए. हिंदी पाठ्यक्रमाला प्रवेश घेतला.
डिसेंबर २०२४ च्या सत्रात या दोघांनीही कोहिनूर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२५ या काळात झालेल्या परीक्षेत मझहर खान आणि आस्मा खान यांनी स्वतः पेपर न सोडवता सर्वच्या सर्व पेपर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक फेरोज शेख आणि कार्यालयीन कर्मचारी बाळू भोपळे यांच्याकडून त्यांच्याच हस्ताक्षरात सोडवून घेतले.
विशेष म्हणजे एखाद्या परीक्षार्थ्याला कोणत्याही परीक्षेत काही अपरिहार्य वैद्यकीय कारणांमुळे स्वतःच्या हस्ताक्षरात पेपर सोडवणे शक्य नसेल तर त्याला परीक्षेपूर्वीच विद्यापीठाकडे रितसर अर्ज करून लेखनिकाची मागणी करून परवागी घ्यावी लागते. अशी कोणतीच प्रक्रिया न करता मझहर खान आणि आस्मा खान यांनी हिंदी विषयातील एम.ए. पाठ्यक्रमाचे सर्वच्या सर्वच पेपर बेकायदेशीरपणे दुसऱ्याकडून सोडवून घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची फसवणूक केली.
मझहर खान आणि आस्मा खान यांच्या या ‘चारसौ बीसी’ची तक्रार रिपाइंचे (आठवले) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्याकडे ३ फेब्रुवारी रोजी केल्यानंतर कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात प्रकुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती.
या चौकशी समितीने डॉ. मझहर खान, आस्मा खान, शिक्षक फिरोज शेख आणि कार्यालयीन कर्मचारी बाळू भोपळे यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर या चौघांनाही म्हणणे मांडण्याची शेवटची संधी म्हणून २० मार्च रोजी विद्यापीठाच्या प्रमाद समितीसमोर हजर राहून म्हणणे मांडण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
कुलगुरूंनी स्थापन केलेली प्रकुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती आणि विद्यापीठाच्या प्रमाद समितीनेही चौकशी करून आता जवळपास तीन महिने उलटत असले तरीही या चौकशीतून नेमके काय निष्पन्न झाले हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. परिणामी स्वतःच्याच महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर स्वतःच विद्यार्थी असताना महाविद्यालयातील कर्मचाऱ्याकडून सर्वच्या सर्व पेपर सोडवून घेऊन विद्यापीठाची फसवणूक करणारे डॉ. मझहर खान आणि आस्मा खान आणि या ‘चारसौ बीसी’मध्ये सामील असलेल्या एकाही व्यक्तीवर अद्याप विद्यापीठाने कोणतीच कारवाई केलेली नाही.
कचखाऊ धोरण कशासाठी?
परीक्षेतील गैरप्रकार आणि फसवणुकीसारख्या गंभीर प्रकरणातही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रशासनाकडून प्रचंड विलंब लावला जात असल्यामुळे विद्यापीठाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मझहर खान आणि आस्मा खान यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता स्वतःचे सर्व पेपर बेकायदेशीरपणे दुसऱ्याकडून सोडवून घेतल्याचे ढळढळीत पुरावे विद्यापीठाकडेच उपलब्ध असताना कारवाई करण्यात विद्यापीठ प्रशासन का कचरत आहे? असा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे.

