
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): बीड जिल्ह्यातील वडवणी येथील वैष्णवी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची होत असलेली मानसिक व आर्थिक पिळवणूक आणि प्रशासनातील अनागोंदीची चौकशी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेली चौकशी समितीच महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला ‘मॅनेज’ झाली आणि या समितीने आर्थिक पिळवणुकीच्या ठोस पुराव्यांकडे दुर्लक्ष करत महाविद्यालय व्यवस्थापनाला ‘हवा तसा’च अहवाल विद्यापीठाकडे सादर केल्याचे धक्कादायक पुरावेच न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत.
बीड जिल्ह्यातील बाहेगव्हाण येथील साहेबराव मस्के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वडवणी येथील वैष्णवी महाविद्यालयातील आठ प्राध्यापकांनी महाविद्यालय व्यवस्थापनाकडून आपली आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असल्याची तक्रार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी ७ मार्च २०२५ रोजी निवृत्तीच्या वाटेवर असलेले विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली. या चौकशी समितीत परतूरच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत खंदारे आणि छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. विक्रम खिलारे यांचा समावेश होता.
साहेबराव मस्के पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय बन्सीधरराव मस्के आणि सचिव डॉ. रणजित बन्सीधरराव मस्के यांनी नॅक करण्यासाठी प्राध्यापकांकडून प्रत्येकी २ लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. नॅकच्या पूर्वी प्रयोगशाळा उभारणीसाठी खर्च केलेले पैसे परत मागितल्यावर ते न देता प्राचार्यासमोर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि वैष्णवी महाविद्यालयात रूजू झाल्यानंतर प्रत्येक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना धमकावून प्रत्येकी १ लाख रुपयांच्या १० एलआयसी पॉलिसी सक्तीने काढून घेण्यात आल्या, अशी येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची व्यवस्थापनाकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीबाबत मुख्य तक्रार होती.
डॉ. वायकर चौकशी समितीने १२ मार्च २०२५ रोजी वैष्णवी महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट दिली आणि प्राध्यापकांच्या तक्रारीतील एकूण ३२ मुद्द्यांवर तक्रारदार प्राध्यापकांना पुरावे मागितले. चौकशीदरम्यान वैष्णवी महाविद्यालयातील ज्या-ज्या प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून संस्थेचे सचिव डॉ. रणजित मस्के यांनी सक्तीने प्रत्येकी १ लाख रुपयांच्या एलआयसी पॉलीसी काढून घेतल्या, त्या त्या प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी चौकशी समितीकडे त्यांच्याकडील एलआयसी पॉलीसीची प्रमाणित प्रमाणपत्रे सादर केली.
चौकशी समितीने तक्रारदारांनी सादर केलेल्या या प्रमाणपत्रात लपलेल्या सत्यतेकडे पद्धतशीरपणे कानाडोळा करत ‘याबाबत कोणताही पुरावा संबंधित अध्यापक देऊ शकले नाहीत. तसेच पॉलीसी ज्या व्यक्तीकडून घेतली ती व्यक्ती महाविद्यालयाशी संबंधित नाही,’ असे निरीक्षण नोंदवून प्राध्यापकांच्या आर्थिक पिळवणुकीच्या या मुख्य आणि ठोस पुराव्याकडेच दुर्लक्ष केले.
वस्तुतः साहेबराव मस्के शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय बन्सीधरराव मस्के आणि सचिव डॉ. रणजित बन्सीधरराव मस्के यांचे दिवंगत बंधू दिनेश बन्सीधरराव मस्के हे एलआयसीचे एजंट होते. त्यांचा एलआयसी एजंसी कोड 068329830098146 असा होता. संस्थेने प्रत्येक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून सक्तीने प्रत्येकी १ लाख रुपयांच्या १०-१० एलआयसी पॉलिसी काढून घेतल्या अशी तक्रार करणाऱ्या प्रत्येक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडे दिनेश बन्सीधरराव मस्के या एकाच एजंटामार्फत काढण्यात आलेली एलआयसीची प्रमाणपत्रे आहेत.

संस्थाचालकांची ‘कोंडी’ टाळण्यासाठीच आटापिटा?
सर्वच्या सर्वच कर्मचाऱ्यांकडे संस्थेचे अध्यक्ष व सचिवांच्या कुटुंबातीलच एजंट व्यक्तीने काढलेल्या एलआयसी पॉलीसीची प्रमाणपत्रे हाच महाविद्यालय व्यवस्थापनाकडून होत असलेल्या सक्तीच्या आर्थिक पिळवणुकीचा ठोस पुरावा असतानाही संबंधित अध्यापक या संबंधीचा ठोस पुरावा देऊ शकते नाही? असे निरीक्षण चौकशी समितीने कशाच्या आधारे नोंदवले? संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मस्के आणि सचिव डॉ. रणजित मस्के आणि एलआयसी पॉलीसी काढणारा एलआयसी एजंटा दिनेश बन्सीधरराव मस्के यांच्या वडिलांचे नाव आणि आडनावही एकच असल्याचे स्पष्टपणे नमूद असतानाही ही प्राध्यापकांची सक्तीने केलेली आर्थिक पिळवणूक आहे असे चौकशी समितीला का वाटले नाही?
शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या आर्थिक पिळवणुकीचा बोलका पुरावा असलेली ही प्रमाणपत्रे रेकॉर्डवर घेतली तर संस्थाचालकांची मोठी अडचण होऊ शकते आणि ते कोंडीत पकडले जाऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊनच चौकशी समितीने आर्थिक पिळवणुकीच्या या ठोस पुराव्यांकडे हेतुतः दुर्लक्ष करून महाविद्यालय व्यवस्थापनाला ‘हवा तसा’ अहवाल तर दिला नाही ना? या सर्व प्रश्नातच चौकशी समितीच्या अंतस्थ हेतुचे उत्तर दडलेले आहे.
चौकशी समितीवर डॉ. मस्केंचे हितसंबंधीच कसे?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने वैष्णवी महाविद्यालयाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीवर संस्थेचे सचिव डॉ. रणजित मस्के यांच्याशी हितसंबंध असलेल्या व्यक्तींचीच वर्णी लावण्यात आल्यामुळेही या चौकशी समितीच्या प्रामाणिकपणावर संशय घ्यायला बराच वाव आहे. चौकशी समितीचे अध्यक्ष डॉ. वायकर हे पाटोद्याचे जावई आहेत आणि त्यांच्या सासुरवाडीतील मान्यवर हे वैष्णवी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे सचिव डॉ. मस्के यांचे नातेवाईक आहेत.
चौकशी समितीचे दुसरे सदस्य डॉ. भारत खंदारे हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या विद्यापीठ उत्कर्ष पॅनलकडून विद्यापीठाच्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेवर निवडून गेलेले आहेत आणि डॉ. रणजित मस्के हे वर्षानुवर्षे आ. सतीश चव्हाण यांच्या निवडणुकीचे वडवणी तालुक्यातील काम पहात आलेले आहे. डॉ. मस्के यांच्याशी असे हितसंबंध असलेल्या व्यक्तींनीच त्यांच्या महाविद्यालयाची चौकशी केली त्यामुळे वस्तुस्थितीचा हेतुतः अपलाप झाला असण्याची शक्यताच अधिक आहे.

