औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच अवघ्या दहा-पंधरा फुटाच्या अंतरावर बांधण्यात येत असलेल्या नवीन प्रवेशद्वाराचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. प्रती विद्यापीठ गेट होऊ देणार नाही, असा निर्धार करत आज आंबेडकरवादी पक्ष आणि संघनांच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. आज गुरूवार, सकाळी ११ वाजता विद्यापीठ गेटवर हे आंदोलन होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाचे काम विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या सुशोभिकरणाचा एक भाग म्हणून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारीच अगदी दहा फुटांच्या अंतरावर ‘इन-आऊट गेट’च्या नावाखाली नवीन गेट बांधण्यात येत आहे. विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार हे नामांतर चळवळीचे प्रतिक तसेच आंबेडकरी जनतेची अस्मिता आणि प्रेरणास्रोत बनले आहे. त्यामुळे या मुख्य प्रवेशद्वाराचे महत्व कमी करण्यासाठीच विद्यापीठ प्रशासनाकडून नवीन प्रवेशद्वार बांधण्यात येत आहे, असा आंबेडकरी नेते आणि कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे.
सुशोभीकरणाच्या नावाखाली हे प्रतिगेट होऊ देणार नाही, असा निर्धार करत आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने आज हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे आंदोलन होईल. निळ्या झेंड्याखाली कार्यरत सर्व आंबेडकरी पक्ष-संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ आंबेडकरी नेत्यांनी यापूर्वीच या नवीन प्रवेशद्वाराच्या बांधकामाला विरोध केला आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाला आमचा विरोध नाही, परंतु सुशोभीकरणाच्या नावाखाली नवीन गेट बांधण्याचे कटकारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा या ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेऊन दिला होता. आंबेडकरी जनतेची इच्छा नसेल तर नवीन गेट बांधणार नाही, असे आश्वासन कुलगुरूंनी या शिष्टमंडळाला दिलेही होते. परंतु तरीही या गेटचे बांधकाम सुरू असल्यामुळे आंबेडकरी जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आजचे आंदोलन होत आहे.