‘आदर्श’च्या ठेवीदारांचा मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडल्याने गोंधळ; खा. जलील आणि पोलिसांत झटापट!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): आदर्श नागरी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेल्या ठेवीदारांनी आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरातील मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा अडवल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेडस् तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. मंत्र्यांनी येऊन मोर्चेकऱ्यांशी संवाद साधावा अन्यथा आम्ही मंत्रिमंडळ बैठकीच्या ठिकाणी जाऊ, अशी भूमिका खा. इम्तियाज जलील यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली आहे.

आदर्श नागरी पतसंस्थेत छत्रपती संभाजीनगर शहरातील शेकडो गुंतवणूकदारांनी ठेवी ठेवल्या आहेत. परंतु या पतसंस्थेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे ठेवीदारांच्या जिंदगीभराची कमाई धोक्यात आली आहे. आदर्श नागरी पतसंस्थेची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे द्या, या मागणीसाठी खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आज मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला. या मोर्चात हजारो ठेवीदार सहभागी झाले आहेत.

आदर्शच्या ठेवीदारांचा खा. जलील यांच्या नेतृत्वातील हा मोर्चा विनापरवानगी काढण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी हा मोर्चा अडवला. पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. पोलिसांनी हा मोर्चा अडवल्यानंतर मंत्र्यांनी येऊन मोर्चेकऱ्यांशी संवाद साधावा, अन्यथा आम्ही मंत्रिमंडळ बैठकीच्या ठिकाणी जाऊ, अशी भूमिका खा. जलील यांनी घेतली.

आदर्श नागरी पतसंस्था व या पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या मालमत्तेचा लिलाव करून गोरगरिब, वयोवृद्ध, कष्टकरी, शेकतरी ठेवीदारांचे हक्कांचे पैसे देण्यात यावेत, आत्महत्या केलेल्या ठेवीदारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची तत्काळ मदत देण्यात यावी, रुग्णालयात भरती असलेल्या ठेवीदारांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासनाने करावा आणि आदर्श पतसंस्थेच्या महाघोटाळ्यात फरार आरोपींना सर्वपरीने सहकार्य करणारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक करण्यात यावी, अशा मागण्या खा. इम्तियाज जलील यांनी केल्या आहेत.

खा. जलील यांच्या नेतृत्वातील ठेवीदारांचा हा मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर मोर्चेकरी आणि पोलिसांत झटापट झाल्याचे पहायला मिळाले.पोलिसांनी खा. जलील यांनाही अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खा. जलील आणि पोलिसांतही काहीकाळ झटापट झाली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून मोर्चेकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर सौम्य लाठीमारही केल्याचे समजते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!